सांगली : महापालिका निवडणुकीसाठी आजी-माजी नगरसेवकांसह १६८ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. नगरसेवक राजू गवळी, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, मनगू सरगर, माधुरी कलकुटगी, दिग्विजय सूर्यवंशी, कांचन भंडारे, प्रियंका बंडगर, युवराज गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवकांचा समावेश होता. मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियानंद कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या छावणीत दाखल होत मुलाखत दिली.राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती रविवारी झाल्या. सांगली-मिरज रस्त्यावरील वसंत कॉलनीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात सांगलीतील १० प्रभागातील ४३ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, युवकचे अध्यक्ष राहुल पवार, सागर घोडके, महिला अध्यक्षा विनया पाठक, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे उपस्थित होते.ढोल-ताशांच्या गजरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रॅलीद्वारे मुलाखतीला येत होते. कोण उघड्या जीपमधून, तर कोण बैलगाडीतून मुलाखतीला आले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यालय बऱ्याच कालावधीनंतर कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते.कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून नेत्यांना हायसे वाटले. इच्छुक उमेदवारांच्या घोषणाबाजीने वसंत कॉलनीही दणाणली होती. आपण केलेली सामाजिक कामे, प्रभागातील अडचणी आपण कशा सोडवू शकतो, यासह विद्यमान नगरसेवकांबाबतही नाराजी व्यक्त केली जात होती.पक्षाचे काम निष्ठेने कसे करीत आलो आहे, पक्षासाठी कसा त्याग केला आहे, याचे अनेक किस्से ऐकण्यास मिळत होते.वीस जागांवर चर्चा व्हावी : संजय बजाजसंजय बजाज म्हणाले की, मुलाखतीला मिळालेला प्रतिसाद पाहता, राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे दिसून येते. काँग्रेसशी आघाडी लवकरात लवकर व्हावी, अशी आमची भूमिका आहे. याबाबत जयंत पाटील व हर्षवर्धन पाटील चर्चा करणार आहेत. जिल्हाध्यक्षांच्या स्तरावर बोलणी सुरू आहे. रविवारी रात्री प्रमुख पदाधिकाºयांची बैठक होऊन काँग्रेसकडे नव्याने प्रस्ताव पाठविणार आहोत. आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईलबैलगाडीतून शक्तिप्रदर्शनप्रभाग ९ मधील इच्छुक भूपाल सरगर हे मुलाखतीसाठी बैलगाडीतून आले होते. २५ ते ३० बैलगाड्यांचा ताफा होता. तसेच काही इच्छुक ढोल-ताशांच्या गजरात मुलाखतस्थळी दाखल होत होते. एका इच्छुकाला तर कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून मुलाखतीला आणले होते.प्रमुख इच्छुकनगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, युवराज गायकवाड, राजू गवळी, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, प्रियंका बंडगर, कांचन भंडारे, माजी नगरसेवक शीतल पाटील, हरिदास पाटील, बाळाराम जाधव, संदीप दळवी, धनंजय कुंडले, अज्जू पटेल, भूपाल सरगर, अनिता पांगम, मीनल कुडाळकर, प्रियानंद कांबळे, गीता पवार, प्रवीण साळवी, अश्विन मुळके.
राष्ट्रवादीच्या तिकिटासाठी १६८ जणांकडून दावेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:17 PM