पलूस : आमणापूर (ता. पलूस) येथील रेल्वेस्थानक विठ्ठलवाडी येथे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, विठ्ठलवाडी येथील रेल्वेच्या जागेचे रेल्वेस्थानकसाठी सपाटीकरण करुन देण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली आहे.आमणापूर येथील सध्याचे रेल्वे स्थानक मुख्य रस्त्यापासून फारच दूर आहे. त्यामुळे पलूस या तालुक्याच्या ठिकाणच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा लाभ मिळत नाही. अनेक वर्षांपासून पलूस व तालुक्यातील नागरिक कृती समितीच्या माध्यमातून लढा देत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी व पलूस तहसील कार्यालयानेही यापूर्वीच रेल्वेस्थानक स्थलांतर करणे योग्य असल्याचे रेल्वे प्रशासनाला लेखी अहवाल देऊन कळविले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही वेळोवेळी सध्याचे रेल्वेस्थानक व स्थलांतरित जागेची पाहणी करुन, रेल्वेस्थानक स्थलांतर केल्यास रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊन, रेल्वेच्याही उत्पन्नात वाढ होणार असल्याचा अहवाल तयार केला आहे. रेल्वे प्रशासनाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच विठ्ठलवाडी येथील जागेची पाहणी केली. आमणापूर रस्त्याच्या पश्चिमेस रेल्वेस्थानक करण्याचे निश्चित झाल्यानंतर, या जागेचे स्थानिक नागरिक व ग्रामपंचायतीने श्रमदानातून सपाटीकरण करुन द्यावे, त्यामुळे रेल्वेस्थानकाचे बांधकाम करणे सोयीचे होईल, असा प्रस्ताव मांडला. त्यास नागरिकांनी सहमती दर्शविली आहे. (वार्ताहर)
विठ्ठलवाडीत रेल्वेस्थानकाचे काम सुरू
By admin | Published: July 17, 2014 11:33 PM