शिराळा : शिराळा तालुक्यात मंगळवार, दि. २० राेजी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या सरीमागून सरी कोसळत आहेत. गेल्या चोवीस तासांत ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, चांदोली धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. शेतकरी वर्गामध्ये या पावसामुळे समाधान असून, घातीची भांगलण सोडून चिखलातील भात भांगलण सुरू आहे.
शिराळा तालुक्याच्या सर्वच विभागांत पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाच्या सरी कोसळतच असून, वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. छोटे पात्र असलेल्या ठिकाणी पाणी पात्राबाहेर पडले आहे. सलग तिसऱ्यादिवशी कोकरुड-रेठरे पूल पाण्याखाली आहे. सततच्या पावसामुळे येळापूर, मेणी परिसरात शेतीचे बांध फुटून नुकसान झाले आहे.
शिराळा पश्चिम भागात तिसऱ्यादिवशी पावसाचा जोर वाढला आहे. परिसरातील ओढे, नाले भरून वाहत होते. पावसामुळे वारणा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून, वारणा नदीवरील कोकरुड-रेठरेदरम्यानचा पूल मंगळवारी सायंकाळी पाण्याखाली गेला. या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. रेठरे, गोंडोली, भराडवाडी, जांभळेवाडी येथील लोकांना पर्यायी मार्ग शोधावा लागला. येळापूर, मेणीसह पाचगणी पठारावर अजूनही पावसाच्या सरी कोसळत असल्याने मेणी ओढ्यावर असणारा येळापूर-समतानगर पूल बुधवारी दुपारपासून पाण्याखाली होता. मुसळधार पावसाने खरीप हंगामात पेरणी केलेल्या शेतांचे बांध फुटून मातीसह उगवण झालेले पीक वाहून गेले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यात जून महिन्यात पडलेल्या वादळी पावसाने मोरणा मध्यम प्रकल्पासह लघुपाटबंधारे आणि सर्व पाझर तलाव जून महिन्यातच भरले. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली होती. मंगळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोली धरणाची साठवण क्षमता ३४ टीएमसी असून, सध्या धरणात २६ टीएमसी पाणीसाठा आहे.एकूण क्षमतेच्या ७५ टक्के धरण भरले आहे.