वारणावती : चांदोली धरण परिसरात रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु झाली. पाणलोट क्षेत्रातून ४,७६६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा २०.०६ टीएमसी झाला आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे भातपिके धोक्यात आली होती. पण आता रविवारपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली. सध्या पावसाची संततधार कायम असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. गेल्या चोवीस तासात २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा २०.०६ टीएमसी असून, त्यांची टक्केवारी ५८.३१ अशी आहे. पाणीपातळी ६१०.४० मीटर झाली आहे. धरणातून ७०० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
पावसामुळे धूळवाफेवरील भातपिकांचा धोका टळला असला तरी चिखलगुठ्ठा पध्दतीने भातरोप लागवड करण्यासाठी आवश्यक पाणी ओढ्यातून येत नसल्याने काही ठिकाणी इंजिन, मोटरच्या सहाय्याने पाणी आणून रोप लागवड करत आहेत. पण सर्रास भातरोप लागवड लांबणीवर पडणार आहे.