कोकरुड : शिराळा पश्चिम भागात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने खरीप हंगामातील भात, मका, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांस संजीवनी मिळाली आहे. पावसाने कांबळेवाडी येथील एका घराची भिंत पडून नुकसान झाले आहे.
पंधरा दिवसाच्या उसंती घेतल्यानंतर सोमवारपासून पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. पश्चिम भागातील सर्व गावे वाड्या-वस्त्यांवर मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे खरीप हंगामातील धूळवाफ पद्धतीने करण्यात आलेल्या भात, मका, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची चांगली वाढ होणार आहे. सततच्या पावसाने ओढे, नाली तुडुंब भरून वाहत आहेत. शेतात पाणी साचल्याने आरळा, मणदूर, गुढे-पाचगणीच्या शिवारात चिखलगुठ्ठा आणि रोपणीच्या कामास वेग आला आहे. गवळेवाडी पैकी कांबळेवाडी येथील बाबूराव श्रीपती काब्दुले यांच्या राहत्या घराची भिंत पडून नुकसान झाले आहे.