शिराळा वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरेश चिल्लावार, ज्ञानदेव वाघ, डॉ. जुबेर मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, मुख्याधिकारी योगेश पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालयास कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या दृष्टीने नियोजनासाठी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी भेट दिली तसेच शिराळा पोलीस ठाणे या ठिकाणी वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणेकामी आढावा बैठक घेतली.
या बैठकीमध्ये त्यांनी तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या, करण्यात आलेली उपाययोजना तसेच जिल्हा नाका-बंदी, लसीकरण केंद्र व लसीकरण केंद्रावरील बंदोबस्त यांचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रत्येक गावामध्ये ग्रामदक्षता समिती स्थापन करून सदरच्या समितीमार्फत गावातील कोरोना रुग्णांवर नियंत्रण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. होम आयसोलेशन असलेले रुग्ण विनाकारण घराबाहेर पडत असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या तसेच लॉकडाऊनच्या नियमांचे देखील काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये कंटेन्मेंट झोन करावेत, असे सांगितले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन तेथील दाखल रुग्ण, ऑक्सिजन साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा याबाबत आढावा घेतला. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, डॉ. अनिरुद्ध काकडे, मुख्याधिकारी योगेश पाटील व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.