सांगली : शहरातील संभाव्य महापुराच्या परिस्थितीचे मुकाबला करण्यासाठी महापालिकेने विविध पातळीवर तयारी सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आता नागरिकांसाठी 'आपत्ती मित्र' नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. त्या ॲपद्वारे नागरिकांना दर दोन तासाला पूर पातळीची माहिती मिळणार आहे. शिवाय निवारा केंद्रे, पूर काळात येणारी मदत याचाही लेखाजोखा ऑनलाइन नागरिकांना पाहता येणार आहे.येत्या आठवडाभरात हे ॲप नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सोमवारी सांगितले. ते म्हणाले की, गतवर्षी सांगली शहराला महापुराचा मोठा फटका बसला होता. यंदा प्रशासनाने पूरस्थितीची मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पुराचे संपूर्ण नियंत्रण मंगलधाम येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या वॉररूममधून केले जाणार आहे.
पूरपट्ट्यात 18 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. एका कॅमेरातून साधारण दीड किलोमीटरचा परिसरावर लक्ष ठेवता येते. हे सर्व कॅमेरे वॉररूमशी जोडले आहेत. आर्यविन पुल आणि मिरजेतील कृष्णा घाटावरही कॅमेरे बसविण्यात आले आहे. नागरिकांना पाण्याची पातळी, निवारा केंद्रे, बाहेरून येणारी मदत यासंदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी आपत्ती मित्र नावाचे ॲप तयार केले आहे.
या ॲपमध्ये हवामान, पाण्याची पातळी, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी, मदत याबाबीचा समावेश केला आहे. नागरिकांना कोणत्या भागात किती पाणी आहे कोणता भाग पाण्याखाली जाणार आहे, ही सारी माहिती ॲपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे त्या त्या भागातील नागरिकांना स्थलांतरित करणे सोयीचे होईल. पाटबंधारे विभागाची समन्वय राखून पाण्याची पातळी ॲप वर अपडेट केली जाणार आहे,असेही कापडणीस यांनी सांगितले.