लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली -मिरजेत पाणीपातळी स्थिर असली तरी अनेक ठिकाणी नागरिक महापुरात अडकले आहेत. त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी स्टेशन चौकात बोटींचे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक नागरिकांच्या मदतीसाठी तैनात केले आहे, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी रविवारी सांगितले.
सूर्यवंशी म्हणाले की, महापालिका क्षेत्रात सांगली आणि मिरजेत अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. अचानक पाणी वाढल्याने अनेक ठिकाणी नागरिक घरात अडकून पडले आहेत. या नागरिकांना तत्काळ मदत पोहोचवून त्यांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठी आणि त्यांच्याकडे बोटी पाठवण्यासाठी स्टेशन चौकात अग्निशमन विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती द्यावी. जेणेकरून त्यांच्या नातेवाइकांना वेळीच बाहेर काढता येईल. मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे आणि त्यांचे पथक बोटीसह स्टेशन चौकात तैनात केले आहे. नागरिकांनी कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.