इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील विविध गावांमध्ये तलाठी म्हणून काम करताना वादग्रस्त ठरलेला सुनील जावीर हा शुक्रवारी कापूसखेड येथील चावडीमध्ये कामगिरीवर असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आला. त्याने तक्रारदाराला ३० हजार लाचेपैकी एका नोंदीच्या प्रकरणातील १५ हजार रुपयांची लाच आपल्या माेटारीत ठेवण्यास सांगितले. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्याचा संशय आल्याने याने धूम ठोकली. मात्र रात्री इस्लामपूर आष्टा रस्त्यावर पथकाने त्याला ताब्यात घेतले.
सुनील बाबूराव जावीर (मूळ रा. मिरजवाडी, ता. वाळवा) हा सध्या महसूल विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या कापूसखेड सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत होता. तक्रारदाराची शेतीजमीन नोंदीची दोन कामे होती. त्यासाठी जावीर याने प्रत्येकी १५ हजार प्रमाणे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबतची तक्रार १४ सप्टेंबर रोजी सांगलीच्या लाचलुचपत विभागाला प्राप्त झाली होती.
लाचलुचपतच्या कार्यपद्धतीनुसार या तक्रारीची पडताळणी केल्यावर सुनील जावीर याने तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी कापसूखेड येथील तलाठी कार्यालय परिसरात लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचना होता. जावीर याच्या सांगण्यानुसार तक्रारदाराने १५ हजार रुपये लाचेची रक्कम जावीर याच्या माेटारीत ठेवली. यानंतर पथकाने झडप घालण्याचा प्रयत्न करताच जावीर घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला.
लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तलाठी कार्यालयाबाहेर असणारी त्याची माेटार जप्त केली. त्याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, हवालदार सलीम मकानदार, अविनाश सागर, धनंजय खाडे, रवींद्र धुमाळ, संजय कलकुटगी, राधिका माने, सीमा माने, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
वादग्रस्त जावीर..!
तलाठी म्हणून काम करणारा सुनील जावीर हा जाईल त्या गावात वादग्रस्त ठरत होता. खात्यातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देण्यामध्येही तो नेहमीच आघाडीवर असायचा. बोरगावमधील महापूर मदतीच्या वाटपात त्याने अनेक पात्र कुटुंबांवर अन्याय केल्याची चर्चा आहे.