सांगली : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनावर घेण्याच्या विषयावरून सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक प्रा. सिकंदर जमादार आणि महेंद्र लाड यांच्यात जोरदार वादावादी झाली. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या या वादाचे परिणाम अजूनही दिसत आहेत. अध्यक्षांनी तूर्त हा विषय बाजूला केला आहे. बँकेत कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. वसुलीच्या प्रक्रियेलाही मर्यादा पडत आहेत. शासनाकडे नोकरभरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असला, तरी अद्याप त्यास मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा मानधनावर घेण्याचा विषय चर्चेला आला होता. मासिक १५ हजार मानधन देऊन अशा प्रकारची तात्पुरती भरती केल्यास कामकाजात मोठी मदत मिळू शकते. प्रशासकांच्या काळापासून सहकार विभागाच्या मान्यतेने अशा प्रकारच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. सध्या ७८ लोक मानधनावर काम करीत आहेत. प्रशासकांच्या कालावधीत राबविलेल्या या मोहिमेचा पुन्हा स्वीकार करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. यावेळी महेंद्र लाड यांनी पलूस तालुक्यातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची शिफारस केली. उपाध्यक्ष संग्राम देशमुख व संचालक मोहनराव कदम यांनीही या शिफारशीला अनुमोदन दिले. संबंधित कर्मचाऱ्याचे काम चांगले असल्याचा दाखलाही संचालकांनी दिला. मात्र, संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त होऊन ४ ते ५ वर्षांचा कालावधी उलटल्याने त्यास न घेता नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मानधनावर घ्यावे, असे प्रा. सिकंदर जमादार यांनी सुचविले. यावरून लाड आणि जमादार यांच्यात वादावादी सुरू झाली. दोन्ही बाजूंनी आवाज वाढला. कदम आणि मदनभाऊ गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसत होते. बँकेत अगदी प्रशासकांनीही मानधनावर नियुक्त्या केल्या असताना आताच या गोष्टीला का विरोध केला जात आहे, मानधनावरील भरतीला कालावधीची अट घालून नेमके काय साध्य करायचे आहे, असे सवाल लाड यांनी उपस्थित केले. शेवटी हा वाद वाढत गेला. जवळपास दीड तास हाच विषय चर्चेत असल्याने अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी मानधनावरील कर्मचारी भरतीचा विषय तूर्त प्रलंबित ठेवला आहे. या वादाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून बँकेत रंगली आहे. काँग्रेसच्याच दोन गटांत झालेल्या या वादानंतर भरती प्रक्रियेचे काय होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. मानधनावरून घोटाळ््यापर्यंत मानधनावरील भरतीचा वाद सुरू असतानाच लाड म्हणाले की, आम्ही कपभर चहासाठीही बँकेच्या मिंध्यात नाही, तरीही आमच्या शिफारसींना विरोध केला जातो. जामदार यांनीही उत्तर देताना, आम्हीसुद्धा कोणाचे ंिमंधे नाही, असे सांगितले. मग १५७ कोटींच्या घोटाळ््याचे काय, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला. आमचा काहीही संबंध नसताना यात आम्हाला निष्कारण ओढले गेले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. चर्चा भलतीकडेच चालल्यानंतर अध्यक्षांनी मध्यस्थी करून वाद मिटविला.
मानधनावरील भरतीवरून संचालकांत वादावादी
By admin | Published: March 27, 2016 12:37 AM