सांगली : खानापूर पंचायत समितीस शासनाकडून मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून विटा येथे १८ दुकानगाळे बांधले आहेत. या गाळ्याच्या पहिल्या मजल्यावरील मोकळ्या जागेत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर आणि राष्ट्रवादीचे अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी बांधकाम केले होते. या बांधकामावरून दोन्ही गटात निर्माण झालेला संघर्ष बुधवारी जिल्हा परिषदेत पोहोचला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष, अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. यामध्ये दोन्ही संस्थांकडून रितसर भाडे घेण्याचा निर्णय घेऊन वादावर पडदा टाकला.खानापूर पंचायत समितीस यशवंत पंचायत राज अभियानातून मिळालेल्या २२ लाख ५० हजाराच्या बक्षिसातून विटा येथे १८ दुकानगाळे बांधले आहेत. दुकान गाळ्यांच्या वर मोकळ्या जागेमध्ये मुळीक यांच्या संस्थेच्या नगरवाचनालयास १२८ चौरस मीटर बांधकाम केले आहे. येथीलच व्यापार संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील ३५२.१८ चौरस मीटर रिकामी जागा वीस वर्षांच्या भाडेकराराने जीवन प्रबोधनी या संस्थेस दिली आहे. ही संस्था अनिल बाबर गटाची आहे. या जागेच्या भाडे वसुलीवरून बाबर आणि मुळीक गटामध्ये वाद होता. भाडे वसुलीबाबत प्रशासनाने नोटिसाही दिल्या होत्या. या प्रश्नावरून मुळीक आणि बाबर गटाचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेत आले होते. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, बांधकाम सभापती गजानन कोठावळे, कार्यकारी अभियंता माळी, सदस्य सुरेश मोहिते यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही संस्थांकडून भाडे वसुलीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी खानापूर पंचायत समितीच्या प्रशासनाने तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना गटविकास अधिकारी संतोष जोशी यांना देण्यात आली. (प्रतिनिधी)
विटा पं.स.च्या जागेवरून बाबर-मुळीक गटात वाद
By admin | Published: July 08, 2015 11:48 PM