कसबे डिग्रज : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आता जिल्ह्याच्या राजकीय पटलावर हालचाली सुरू झाल्या आहे. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सांगलीलोकसभा आणि विधानसभेच्या जागेवरून जुगलबंदी रंगली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीत सध्या राष्ट्रवादी हाच मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत तर राष्ट्रवादीचे निर्णय राज्यात होतात. जिल्ह्यात पक्षाची वाढती ताकद लक्षात घेता सांगली लोकसभा व विधानसभा या दोन्ही जागांवर आमचे कार्यकर्ते हक्क सांगत आहेत.हा धागा पकडत काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले की, आपण लोकसभेसाठी इच्छुक असून सांगलीच्या जागेवर राष्ट्रवादीने हक्क न सांगता ही जागा काँग्रेसला सोडावी.काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम म्हणाले की, आता देशात बदलाचे वारे असल्याने आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे सरकार सत्तेत येईल. सांगली लोकसभा क्षेत्रात आजपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व असून तो काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने ही जागा काँग्रेसला मिळणारच आणि मीच तिकीट देणार.काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली लोकसभेची जागा अनेक वर्षे काँग्रेसकडे असून महाविकास आघाडी झाल्यास ही जागा काँग्रेसला आणि पर्यायाने विशाल पाटील यांना मिळावी जेणेकरून मला विधानसभेला मार्ग मोकळा होईल.जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील म्हणाल्या, जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकीप्रमाणेच जिल्ह्यात काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळेल.यावेळी बाजार समितीच्या नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, उद्योजक भालचंद्र पाटील, रवींद्र परमणे, अरुण पवार आदी उपस्थित होते.
एकसंघ राहिल्यास लोकसभेला ४२ जागाआगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकसंघ लढल्यास लोकसभेला ४२ हून अधिक तर विधानसभेला २०० हून अधिक जागा मिळण्याचा दावा आमदार जयंत पाटील यांनी केला.