सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी (लाख लिटर प्रतिदिन) प्रकल्पाच्या ७ जून रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ््यावरून सोमवारी महापालिकेतील बैठकीत महापौर हारुण शिकलगार व सुधार समितीचे निमंत्रक अॅड. अमित शिंदे यांच्यात वादावादी झाली. महापालिका प्रशासनाने समितीची मनधरणी करीत वादावर पडदा पाडला. समितीनेही याप्रश्नी नियोजित आंदोलन रद्द केले.
महापौर शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर आणि सुधार समितीचे निमंत्रक अॅड.अमित शिंदे यांची संयुक्त बैठक सोमवारी महापालिकेत पार पडली. राजकारण्यांच्याहस्ते उद्घाटन करण्यासाठी हा प्रकल्प सुरू न करता लांबणीवर टाकण्याचे काम महापालिकेने केल्याचा आरोप करीत सुधार समितीने ज्येष्ठ नागरिक व स्वातंत्र्यसैनिकांच्याहस्ते प्रकल्प सुरू करण्याचा इशारा रविवारी दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी महापौर आणि आयुक्तांनी चर्चा करुन तोडगा काढावा, असे आदेश दिले होते. त्यामुळे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी तातडीने सुधार समितीचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, महापौर यांची बैठक बोलावली. यावेळी पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, उपायुक्त सुनील पवार, महापौर हारुण शिकलगार, पाणी पुरवठा अधिकारी शीतल उपाध्ये, सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे, सचिव रवींद्र काळोखे, अॅड. अरुणा शिंदे, सचिन चोपडे, संतोष शिंदे, गजानन गायकवाड, महालिंग हेगडे, सुधीर नवले, रमेश डफळापुरे उपस्थित होते.
सत्ताधारी काँग्रेसने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७० एमएलडी जलशुध्दीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ७ जून रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यांनी कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच, सांगली जिल्हा सुधार समितीने आधी प्रकल्प कार्यान्वित करा, नंतर कुणाच्याही हस्ते उद्घाटन करा, अशी भूमिका जाहीर केली होती. सोमवारी बैठकीतही त्यांनी हाच मुद्दा मांडला. अॅड. शिंदे म्हणाले की, पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने झाल्याचे जाहीर करून तसे लेखी पत्र महापालिकेने द्यावे, प्रकल्पाचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते करा,अशी मागणी केली. यावेळी महापौर शिकलगार यांनी निमंत्रण पत्रिका तयार झाली आहे, कार्यक्रमाचा प्रोटोकॉल असल्याने सुधार समितीने अशी भूमिका घेऊ नये, असे मत मांडले.
यावर अॅड. शिंदे म्हणाले, गेली पस्तीस वर्षे सांगलीकर दूषित पाणी सहन करीत आहेत. या नियोजनात नागरिकांनाही सहभागी करून घेतले पाहिजे, अशी मागणी केली. त्यावरूनच वादाची ठिणगी पडली. शिंदे व शिकलगार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शिकलगार म्हणाले की, विनाकारण तुम्ही कार्यक्रमात आडकाठी आणू नका. त्यावरूनच दोघांमध्ये जुंपली.स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रण : मागणी मान्यप्रकल्पाचे उद्घाटन स्वातंत्र्यसैनिकांच्याहस्ते घेण्यावर सुधार समिती पदाधिकारी ठाम राहिले. त्यावर वाद वाढवू नका, अशी सूचना पोलीस अधिकारी धीरज पाटील, आयुक्त खेबूडकर यांनी केली. शेवटी स्वातंत्र्यसैनिकांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. आज-उद्या या स्वातंत्र्यसैनिकांना रितसर निमंत्रण देण्यात येईल, असे पाणी पुरवठा अधिकारी उपाध्ये यांनी सांगितले.आयुक्तांचे चांगले काम...शामरावनगरचा प्रश्नही या बैठकीत उपस्थित झाला. महापौर शिकलगार यावेळी म्हणाले की, प्रशासन व आमदार यांच्यात वाद नको, म्हणून शामरावनगरातील चरी मुजवण्यासाठी महापालिकेचे सव्वाकोटी पीडब्ल्यूडीकडे वर्ग केले. आयुक्तांनी हे काम चांगले केले. त्यांनी आयुक्तांना चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.