सांगली : शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्गावरील (शंभर फुटी रस्ता) अतिक्रमणावर सोमवारी महापालिकेने हातोडा टाकला. अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी दहापासून फलक हटविण्याची मोहीम सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या रस्त्यावरील अनेक फलक पथकाने जमीनदोस्त केले. यावेळी फलक हटविताना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण महापालिका पथकाने विरोध झुगारून कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे शंभरफुटी रस्त्याने मोकळा श्वास घेतला.महापालिकेवर प्रशासक राजवट सुरू झाल्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त वैभव साबळे यांनी फलक, होर्डिंग्ज काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत सोमवारी संपली. सकाळी दहा वाजता उपायुक्त साबळे अतिक्रमण पथकासह शंभरफुटी रस्त्यावर उतरले. पहिल्या टप्प्यात पादचारी मार्ग मोकळे करण्यात आले. रस्त्यावर बांधकाम करून उभारण्यात आलेले फलक मोडून काढण्यात आले. दोन जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेवल्याने त्यांच्या दंडात्मक कारवाई झाली. रस्त्यावरील फलक उखडून टाकण्यात आले. भाजीपाला संघटनेचे नेते शंभोराज काटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शंभरफुटी रस्ता शेवटपर्यंत अतिक्रमण मुक्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेवटपर्यंत ही कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. उपायुक्त साबळे यांच्यासह अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे, सहायक आयुक्त सचिन सागावकर, सहदेव काकडे यांच्यासह पथकाचा कारवाईत समावेश होता.
सांगलीत अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी वादावादी, राजकीय पक्षासह व्यवसायिकांचा विरोध
By शीतल पाटील | Published: August 28, 2023 6:07 PM