मालगाव : बोलवाड (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनेने फोटो लावण्यास आक्षेप घेतला आहे तर विरोधी गटाने व दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे.ग्रामपंचायतीमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावला आहे. राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश नसल्याचे सांगत हिंदुत्ववादी संघटनेने विरोध दर्शवला तसेच फोटो काढण्याची मागणी केली. या फोटोवरून नवा वाद होऊ नये म्हणून सत्ताधारी गटाने फोटो काढला तेव्हा विरोधी गटाचे सदस्य सचिन कांबळे आणि इतर कार्यकर्ते, ‘एमआयएम’ चे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी पुन्हा फोटो लावण्यास भाग पाडले. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली. हा फोटो काढावा, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनच्यावतीने प्रशासनाकडे केली आहे.
राष्ट्रपुरूषांच्या यादीत नाव नसल्याने फोटो लावणे योग्य नाही. त्यामुळे फोटो काढण्यात यावा अशी आमची मागणी आहे. - विष्णू पाटील, जिल्हाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन
राष्ट्रपुरुषांच्या यादीत समावेश नसला तरी फोटो लावू नये, असाही आदेश नाही. आदेश असल्यास तो दाखवावा. दबावाखाली फोटो हलविणे निषेधार्ह आहे. - डाॅ. महेशकुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष एमआयएम