सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ते उत्साहाने, जोमाने कामाला लागले पाहिजेत, यासाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. यामध्ये दुसरा कोणताही अर्थ मित्रपक्षांनी काढू नये. कारण, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगलीतील सभा आणि अन्य मेळाव्यातही मी सहभागी होतो, असा खुलासा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला आहे.पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ज्या काही घटना सांगलीत घडल्या, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते. पण, आघाडीच्या सर्व कार्यक्रमात आम्ही सहभाग घेतला हाेता. प्रचारानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन ठेवले होते.
काय आहे प्रकार?लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी कुणालाही विचारात न घेता, याठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यासह नेते आग्रही होते. मात्र ठाकरे यांनी उमेदवार मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा इथले काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचे काम केल्याचे सांगलीत उघडपणे बोलले जाते.