सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो महापौर दालनात लावण्यावरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी व पवार समर्थक नगरसेवक अतहर नायकवडी यांच्यात शाब्दिक वाद झाला. पवारांचा फोटो महापौरांनी कार्यालयात न लावल्याने स्वत: नायकवडी यांनी रेटून भिंतीवर लावला. यामुळे संतप्त महापौरांनी नायकवडी यांना स्टंटबाजी करू नका, अशा शब्दात सुनावले आणि फोटो महापौर दालनातून उतरवला.राज्यात शरद पवार समर्थक विरूध्द अजित पवार समर्थक असा संघर्ष सुरू झाला आहे. त्याचे पडसाद सोमवारी सांगली महापालिकेत उमटले. मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर महापौैर दिग्विजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली होती. मात्र सूर्यवंशी यांनी शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.या घडामोडी सुरू असताना सोमवारी अजित पवार समर्थक नगरसेवक अतहर नायकवडी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना अजित पवार यांचा फोटो भेट दिला. महापौर कार्यालयात हा फोटो लावावा, अशी मागणी त्यांनी केली. महापौर सूर्यवंशी यांनी कर्मचारी बोलावून सायंकाळी फोटो लावून घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र नायकवडी यांनी महापौरांचे ऐकले नाही. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयात फोटो लावला.यामुळे महापौर संतप्त झाले. तुमचा फोटो मी स्वीकारला आहे, मी महापालिका कर्मचार्यांकडून फोटो लावून घेतो, तुम्ही स्टंटबाजी करू नका, असे म्हणत महापौरांनी नायकवडी यांना सुनावले. त्यानंतर नायकवडी कार्यालयात सोडून गेले. सूर्यवंशी यांनी अजित पवारांचा फोटो काढून ठेवला. या घटनेची चर्चा मात्र महापालिकेत चांगलीच रंगली होती.नायकवडींकडून स्टंटबाजी : महापौर सूर्यवंशीअजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. आमच्या घरात अनेक वर्षांपासून त्यांचा फोटो लावला आहे. मात्र एका नगरसेवकाने जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी फोटोची स्टंटबाजी केली. हे महापौर कार्यालय आहे. काही नियम असतात. त्यामुळे फोटो आम्ही लावतो, असे त्यांना सांगितले होते. त्यांनी न ऐकता रेटून फोटो लावला. हा प्रकार चुकीचा असून केवळ स्टंटबाजीसाठी केल्याचा आरोप महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला.
अजित पवारांच्या फोटोवरून सांगली महापालिकेत वादावादी, दालनात फोटो लावण्यावरून स्टटंबाजी
By शीतल पाटील | Published: July 10, 2023 7:17 PM