सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून दावेदारी, वादाचे प्रसंग; विश्वजित कदम यांनी केली दोन्ही गटांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:05 PM2024-10-03T17:05:57+5:302024-10-03T17:06:51+5:30

लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही कदम यांचा पुढाकार

Controversy over Sangli Assembly candidature; Vishwajit Kadam discussed with both the groups | सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून दावेदारी, वादाचे प्रसंग; विश्वजित कदम यांनी केली दोन्ही गटांशी चर्चा

सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून दावेदारी, वादाचे प्रसंग; विश्वजित कदम यांनी केली दोन्ही गटांशी चर्चा

सांगली : काँग्रेस अंतर्गत सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून उघड दावेदारी व वादाचे प्रसंग उद्भवल्यानंतर पक्षाचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी (दि. २) रात्री शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारीसाठी दावेदारी स्पष्ट केली.

भारती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका सभागृहात ही बैठक रात्री पार पडली. या बैठकीस कदम यांच्यासह खासदार विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, माजी महापौर किशोर जामदार, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, संजय मेंढे, मदनभाऊ युवा मंचचे आनंदा लेंगरे, शीतल लोंढे, कय्युम पटवेगार, प्रशांत पाटील, वर्षा निंबाळकर यांच्यासह काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. सांगली विधानसभा मतदारसंघाबाबत कदम यांनी ही बैठक बोलावली होती.

कदम म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. समन्वयाने काम केल्यास विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला मोठे यश मिळू शकते. सांगली विधानसभा मतदारसंघातही पक्षाची ताकद सर्वात जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी एकसंधपणे सर्वांनी काम करावे. लोकशाही मार्गाने मते मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्या अधिकारावर गदा येणार नाही. मात्र, निवडणुकांत पक्षाच्या आदेशाचे पालन सर्वांनी करायलाच हवे.

उमेदवारीसाठी दावेदारीची चर्चा

जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांनी कदम यांच्याकडे उमेदवारीचा मुद्दा आग्रहाने मांडला. उमेदवारी कोणत्याही परिस्थितीत जयश्रीताईंना मिळावी. उमेदवारी न मिळाल्यासही लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

सांगलीतील काँग्रेसमध्ये धुसफूस

सांगली शहरात काँग्रेसअंतर्गत पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्या गटात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. दोन्ही गट वेगवेगळ्या वाटेवरून जात आहेत. बैठकीवेळीही दोन्ही गटांचे समर्थक एकमेकांशी फटकून होते, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही कदम यांचा पुढाकार

लोकसभा निवडणुकीवेळी विश्वजित कदम यांनी काँग्रेसची मोट बांधली होती. आता विधानसभेसाठीही त्यांनी सर्वांना एकत्र आणून पक्षीय ताकद वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी बुधवारी ही बैठक घेतली.

Web Title: Controversy over Sangli Assembly candidature; Vishwajit Kadam discussed with both the groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.