शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्याचे आराध्य दैवत श्री महांकाली देवीच्या मंदिराच्या बांधकामावरून स्थानिक नागरिक व ट्रस्टमधील वाद विकोपाला गेला आहे. आज, (दि. ४) नागरिकांनी ‘कवठेमहांकाळ बंद’चे आवाहन केले आहे.महांकाली देव व मारुती देव ट्रस्टने श्री महांकाली मंदिराच्या सुशोभिकरणाचा आराखडा असलेला फलक मंदिर परिसरात लावला. शहरातील नागरिकांनी तो आराखडा योग्य वाटला नाही. त्यात गाळ्यांचा समावेश असून, त्याला नागरिकांचा विरोध आहे. त्याऐवजी गाळे नसल्याचा आराखडा मंजूर करावा, या मागणीसाठी बुधवार, दि. ४ जानेवारी रोजी कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती गावकऱ्यांतर्फे पांडुरंग पाटील व दिलीप पाटील यांनी दिली.गेल्या काही दिवसांमध्ये ग्रामस्थ व मंदिराचे ट्रस्टी यांच्यामध्ये एकमत होत नसल्याने बांधकामाबाबत अंतिम निर्णय होत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
महांकाली देव व मारुती देव ट्रस्टकडून दगडी कमान तयार केली जाणार आहे. मात्र आराखड्यात गाळे कायम राहतील. शासनाकडून आलेला निधी परत जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. लोकसहभागातून दोन्ही बाजूला मोठी दगडी कमान तयार करण्यास ट्रस्ट तयार आहे. -निशिकांत गुरव, सचिव, महांकाली देव व मारुती देव ट्रस्ट.
कवठेमहांकाळ शहरात विनागाळ्यांचा आराखडा तयार आहे, तो मंजूर करावा यासाठी कवठेमहांकाळ शहरातील ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला शहर व्यापार असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. शहर बंद ठेवून ग्रामस्थांनी आंदोलनास पाठिंबा द्यावा. -वैभव बोगार, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन.