सांगली : वैद्यकीय शिक्षण, संशोधन संचालनालयाने राज्यभरातील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयांतील काही प्राध्यापकांच्या बदल्या केल्या आहेत. दूरदूर नियुक्त्या केल्याने अनेकांनी त्या स्वीकारलेल्या नाहीत. मिरज शासकीय रुग्णालयातही तशीच स्थिती असून काही विभाग सध्या प्रमुखांविनाच आहेत. तेथील प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे.मिरज महाविद्यालयातील क्ष-किरणशास्त्र विभाग आणि इमर्जन्सी मेडिसीन विभागाच्या प्रमुखांची बदली करण्यात आली आहे. पैकी क्ष-किरणशास्त्र विभागाचे प्राध्यापक २०१७ पासून विभागप्रमुख म्हणून करार स्वरूपात काम करत होते. त्यांची बदली जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात याच पदावर करण्यात आली आहे. बदलीमुळे रिक्त झालेल्या मिरजेतील जागेवर मुंबईतील जे.जे. महाविद्यालयातील प्राध्यापकाची नियुक्ती केली आहे. पण दोहोंनी बदली नाकारली आहे. दूर अंतर आणि गैरसोयीमुळे रुजू होणार नसल्याचे कळविले आहे. मुंबईचे प्राध्यापक मिरजेला आलेले नाहीत, तर मिरजेचे जळगावला गेलेले नाहीत. त्यामुळे क्ष-किरणशास्त्र विभागात सध्या प्रमुखाविना कामकाज सुरू आहे. याचा मोठा परिणाम शैक्षणिक कामकाजावर झाला आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राध्यापक उपलब्ध नाही. सहयोगी प्राध्यापकाकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. इमर्जन्सी मेडिसीन विभागाची अवस्थाही अशीच आहे.
नव्या महाविद्यालयांसाठी जुन्यांची उचलबांगडीराज्यात गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद आदी ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. तेथे नव्याने पदभरती करण्याऐवजी जुन्याच महाविद्यालयांतील प्राध्यापकांची उचलबांगडी करून नव्या महाविद्यालयांत नियुक्ती दिली जात आहे. बदलीपूर्वी प्राध्यापकांना त्यांना अपेक्षित ठिकाणे विचारण्यात आली होती, पण प्रत्यक्ष बदलीवेळी मात्र दखल घेण्यात आली नाही. मनमानी बदल्यांमुळे वैद्यकीय शिक्षण विस्कळीत झाले आहे. याविरोधात मार्डने आक्रमक भूमिका घेतली आहे. मिरजेतील मार्डचे डॉक्टर्स अधिष्ठात्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
सांगलीतही रिक्त पदांची समस्यासांगलीतील शासकीय रुग्णालयातील उपअधिष्ठाता डॉ. पी. डी. गुरव यांची सिंधुदुर्ग येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातापदी बदली करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे या दोन्ही जागा सध्या रिक्त आहेत.