सांगली : माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर पॅटर्ननुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली. कारखानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यावरून शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताब्यात असलेल्या राजारामबापू कारखान्यावर ठिय्या मारला. येथे जयंतराव आणि शेट्टी यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्यामुळे ऊस दराची कोंडी फुटण्याऐवजी शेतकऱ्यांचीच आर्थिक कोंडी निर्माण झाली.जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यापैकी १८ कारखाने गळीत हंगाम घेत आहेत. या कारखान्यांसाठी एक लाख ३५ हजार ६८८.८ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गळीतासाठी मिळणार आहे. गतवर्षीपेक्षा पाच हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. दुष्काळामुळेही उसाच्या उताऱ्यात घट येणार आहे. या सर्व समस्या कारखाना व्यवस्थापनासमोर आहेत. दुसऱ्या बाजूला उसाचे क्षेत्र कमी आणि साखरेला बाजारात जादा दर असतानाही कारखानदार जादा दर देण्यासाठी तयार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीवर प्रति टन ५० आणि १०० रुपये देण्यास तयार आहेत. पण, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूर जिल्ह्याचा पॅटर्न मान्य नसल्याचे जाहीर केले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील कारखानदारांना जमत असेल तर सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनाच अडचण काय, असा सवालही शेतकरी करत आहेत. ऊस दराची कोंडी फोडण्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकाही कारणीभूत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हातकणंगले लोकसभेच्या मैदानात राजू शेट्टी यांनी उतरणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. याच मैदानात जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांची चाचपणी चालू आहे. कोल्हापूर पॅटर्न सांगली जिल्ह्याने स्वीकारला तर राजू शेट्टी यांना श्रेय जाणार आहे. म्हणूनच जयंत पाटील आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदार कोल्हापूर पॅटर्न मान्य करण्यास तयार नाहीत, असा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. एकंदरीत काय तर जयंतराव आणि शेट्टी वादात शेतकऱ्यांची मात्र आर्थिक कोंडी होत आहे. नेत्यांनी राजकीय वाद बाजूला ठेवून ऊस दराची कोंडी फोडावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
काँग्रेस नेत्यांचीही गोचीकाँग्रेसचे नेते माजीमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांची राजू शेट्टी यांची चांगली गट्टी आहे. कदम, पाटील यांना कोल्हापूर पॅटर्न मान्य आहे. पण, शेट्टी यांना दुखवायचे नाही आणि जयंत पाटील यांच्याशी वैर घ्यायचे नाही, अशा मनस्थितीमध्ये कदम आणि पाटील आहेत. नेत्यांच्या या राजकारणात शेतकऱ्यांचे आर्थिक दिवाळे निघत असल्याच्या चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहेत.