सांगली : जादा दराने झालेली चापकटर खरेदी व त्यावरील वाद-प्रतिवादावरून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. कृषी विभागाने खरेदी केलेल्या चापकटर खरेदी प्रकरणामुळे जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. या प्र्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीवर सदस्य ठाम राहिल्याने अखेर चापकटर खरेदी प्रक्रियेच्या चौकशीसाठी समिती नेमून येत्या पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी गुरूवारी दिले. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीहून हजर झालेल्या २७ शिक्षकांना सोयीच्या नेमणुका द्याव्यात, या मागणीवर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितला. जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या ५८.३६ कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. या सर्वसाधारण सभेत कृषी विभागाची साहित्य खरेदी प्रकरण व शिक्षकांच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न गाजणार, हे अपेक्षित होतेच. त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या चापकटर खरेदीत जादा दराने खरेदी झाल्याने जिल्हा परिषदेचे १७ लाख ८६ हजारांचे नुकसान झाले असून याची वसुली संबंधितांकडून वसुली करण्यात यावी, असा ठराव करण्याची मागणी रणधीर नाईक यांनी केली. या विषयावर सभेत जोरदार चर्चा झाली. याबाबत समाधानकारक उत्तर देताना कृषी अधिकारी भोसले यांची अक्षरश: दमछाक उडाली होती. नाईक यांच्याबरोबरच सुरेश मोहिते, छायाताई खरमाटे, मीनाक्षी महाडिक यांनीही या विषयावर मुद्दे मांडत साहित्य खरेदीप्रकरणी वसुली करण्याची मागणी लावून धरली. अखेर अध्यक्षा पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्याचा निर्णय झाला. यावर, पाटील यांची समिती नको, असा पवित्रा सदस्यांनी घेतल्याने अखेर प्रकल्प संचालक अजयकुमार माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे चौकशी करून अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. आंतरजिल्हा बदलीहून आलेले २७ शिक्षक जिल्हा परिषदेकडे हजर होऊन दोन महिने होत आले तरीही त्यांना सोयीच्या ठिकाणी नेमणूक दिली नसल्याबाबत सभेत जोरदार चर्चा झाली. दहा ते पंधरा वर्षे या शिक्षकांनी घरापासून दूर काम केल्याने त्यांची सोयीच्या ठिकाणी बदली करावी, अशी मागणी सदस्य सुरेश मोहिते, गजानन कोठावळे, प्रकाश देसाई आदींनी लावून धरली. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी यावर, या शिक्षकांना १४ जूनला बदलीचे आदेश जारी करण्यात आल्याने आता यात बदल करण्यासाठी विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठविणे आवश्यक असून, सदस्यांची मागणी लक्षात घेता, दोन दिवसात प्रस्ताव सादर करू, असे सांगितले. सीईओंनी आयुक्तांकडे प्रस्ताव न पाठविता आदेशात अंशत: बदल करण्याची मागणी सदस्यांनी केली. मात्र, आयुक्तांकडेच प्रस्ताव पाठवून त्यात बदल करता येईल, असे भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सभापतींनी जोडले हातचापकटर खरेदी प्रकरणावरून सभागृहातील वातावरण गरम झाले असतानाच कृषी सभापती संजीव सावंत यांनीही आपला संताप व्यक्त करीत कृषी अधिकाऱ्यांच्या कारभारावर हात जोडले. अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगताच, सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नसल्यास कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. सोलर पंपाचे प्रस्ताव तीन महिने झाले तरी दिले नसल्याचे सभापतींनी सांगताच, अधिकारी तुमचे ऐकत नसल्यास कृषी सभापतींनी राजीनामा द्यावा असे म्हणताच, सभापती सावंत यांनीही राजीनामाची तयारी दर्शविली. जिल्हा परिषदेतर्फे विविध योजनेतून देण्यात येणाऱ्या साहित्याच्या दर्जाबाबत सभेत चर्चा झाली. याचे उदाहरण देताना सदस्या मीनाक्षी महाडिक यांनी सांगितले की, दिलेली शिलाई यंत्रे अजिबात चालत नाहीत, पिठाच्या गिरण्या दोन दळणे झाल्यानंतरच बंद पडत आहेत. सायकली तर सहा महिनेच कशातरी टिकतात. त्यामुळे जिल्हा परिषदेने दर्जेदार साहित्यांचीच खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी साहित्य खरेदीबाबत अनुदान लाभार्थीला देण्यात यावे की साहित्यच देण्यात यावे, यावर सभेत वादळी चर्चा झाली.
चापकटर खरेदीवरून जिल्हा परिषदेत वादंग
By admin | Published: July 28, 2016 11:54 PM