सोयीचे राजकारण! सांगलीत बाजार समित्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिंदे-ठाकरे गटांची हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:05 PM2023-04-21T12:05:53+5:302023-04-21T12:06:39+5:30
इस्लामपुरात आजवर राष्ट्रवादीसाठी एकतर्फी असणाऱ्या निवडणुकीत प्रथमच आव्हान
सांगली : बाजार समित्यांसाठी सर्वच पक्ष व नेत्यांनी सोयीचे राजकारण केल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटांनी काही ठिकाणी हातमिळवणी केली आहे. सांगलीबाजार समितीसाठी महाआघाडीचा भाजप-शिंदे गटाशी सामना होणार असून, दोन्ही पॅनलनी उमेदवारांची यादी रात्री उशिरापर्यंत जाहीर केलेली नव्हती.
महाविकास आघाडीत गोंधळाचे वातावरण आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी त्यांच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. काँग्रेस व राष्ट्रवादीने खंजीर खुपसल्याचा आरोप करत बदला घेऊ, असा इशारा दिला. शिवसेनेच्या नावाखाली अजितराव घोरपडे गटाला उमेदवारी देण्याला आक्षेप घेतला. फक्त फायद्यापुरता शिवसेनेचा वापर करणाऱ्या घोरपडेंची पक्षातून हकालपट्टीची जाहीर मागणी केली.
पलूस, शिराळा बिनविरोध
पलूसमध्ये काँग्रेस १०, राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी तीन आणि स्वाभिमानी विकास आघाडी व शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागा देण्यात आली. १८ जागांसाठीच्या निवडणुकीत उर्वरित उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. शिराळ्यातही राष्ट्रवादीला १४ व भाजपला ४ जागा देण्याचा समझोता झाला. त्यानंतर ५८ पैकी ४० जणांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
विटा, आटपाडीत सोयीचे राजकारण
विटा बाजार समितीत काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) व भाजपने युती केली. काँग्रेसने १० जागा घेऊन शिवसेना-भाजपला ८ जागा दिल्या. या युतीविरोधात राष्ट्रवादीने स्वतंत्र पॅनल लावले. आटपाडीत भाजप-राष्ट्रवादीने हातमिळवणी केली. त्यांच्याविरोधात शिंदे गट, काँग्रेस, रासप एकत्र आले. इस्लामपुरात जयंत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटले; पण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. इस्लामपुरात आजवर राष्ट्रवादीसाठी एकतर्फी असणाऱ्या निवडणुकीत प्रथमच आव्हान निर्माण झाले आहे.
- सांगली बाजार समितीसाठी एकूण जागा १८ : मिरज, जत व कवठेमहांकाळ तालुक्यात मतदारसंख्या ८६७५.
- सातही समित्यांची एकत्रित मतदारसंख्या २४ हजार ५२८
- मतदान: सांगली, इस्लमपूर बाजारसमितीसाठी२८ एप्रिल तर उर्वरित पाच समित्यांसाठी ३० एप्रिल
- मतमोजणी मतदान संपल्यावर लगेच