संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा राजकीय संघर्षाचा किंवा एखाद्या तालुक्याच्या विकासाला चालना देणारा विषय नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांची सोय महत्त्वाची आहे. त्यामुळे उपकेंद्रासाठी सांगली परिसरच सर्वांगीणदृष्ट्या योग्य असल्याची भूमिका विविध स्तरातून व्यक्त होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील जाणकारांच्या भूमिका ‘लोकमत’ने जाणून घेतल्या असता, सांगली-मिरजेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले.
उपकेंद्र सांगली शहरात होणेच योग्य आहे. जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था सांगली, मिरज व परिसरात आहेत. उपकेंद्र कोठेेतरी आडवळणी गावात नेल्यास विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल. उपकेंद्र हा राजकीय विषय नसून, त्याकडे शैक्षणिक व प्रशासकीय सोयीच्यादृष्टीने पाहिले गेले पाहिजे.
- प्रा. डॉ. भास्कर ताम्हणकर, प्राचार्य, विलिंग्डन महाविद्यालय
उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, गतिमान इंटरनेट सुविधा, जिल्हाभरातून दळणवळण आदी सुविधा फक्त महापालिका क्षेत्रातच मिळू शकतात. सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे, त्यामुळे उपकेंद्र सांगलीतच होणे योग्य ठरेल. त्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल.
- दिग्विजय सूर्यवंशी, महापौर
सोयी-सुविधांच्यादृष्टीने उपकेंद्रासाठी सांगली मध्यवर्ती ठिकाण ठरेल. जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाची महाविद्यालये सांगली-मिरजेत आहेत, विद्यार्थीसंख्याही जास्त आहे, त्यामुळे उपकेंद्र सांगलीतच व्हायला हवे.
- सुधीर गाडगीळ, आमदार
उपकेंद्र सांगली-मिरजेजवळ होणे सर्वांसाठी सोयीचे आहे. जत किंवा शिराळ्याचा विद्यार्थी खानापूर किंवा बस्तवडेला जायचा झाला तर त्याचा अर्धाअधिक दिवस प्रवासातच जाईल. त्यामुळे उपकेंद्र हा राजकीय विषय न करता योग्य निर्णय झाला पाहिजे. ते सांगलीत होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन लढा देऊ.
- पृथ्वीराज पाटील, शहर-जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस
विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी सांगली परिसरात जागा उपलब्ध आहेत. मिरजेत शासकीय दूध योजनेची १०० एकरहून अधिक जागा सध्या पडून आहे. रेल्वे आणि बससेवेमुळे मिरजेचा जिल्हाभराशी संपर्क आहे, त्यामुळे उपकेंद्र महापालिका क्षेत्रात, किंबहुना मिरजेत झाल्यास सर्वांच्या सोयीचे होणार आहे.
- मकरंद देशपांडे, भाजप नेते
खुद्द विद्यापीठानेही सांगली शहर व परिसरालाच पसंती दिली आहे. उपकेंद्र इतरत्र झाल्यास प्रशासन पूर्णवेळ देऊ शकणार नाही. जिल्ह्यातील १३०पैकी ९०हून अधिक महाविद्यालये सांगलीजवळ आहेत, त्यामुळे उपकेंद्र महापालिका हद्दीतच हवे. शिवाय कवलापूर विमानतळाची जागाही सोयीची ठरेल. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनीही ताकद लावली पाहिजे.
- ॲड. अमित शिंदे, निमंत्रक, विद्यापीठ उपकेंद्र कृती समिती
उपकेंद्र समितीने बस्तवडे येथील जागा डोंगराळ असल्याने यापूर्वीच नाकारली आहे. खानापूरच्या जागेसाठीही जिल्हा प्रशासनाने फारसा प्रतिसाद दिलेला नाही. विद्यापीठाने व जिल्हा प्रशासनाने यातून तोडगा काढावा. सर्वांची सोय होईल, अशी जागा निवडून उपकेंद्राचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. आपसातील संघर्षामुळे उपकेंद्र लांबणीवर पडेल, असे होऊ नये.
- उमेश देशमुख, सरचिटणीस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
जिल्ह्यातील ६० टक्के महाविद्यालये आणि किमान चार तालुक्यांसाठी वाहतूक व इतर साधन-सुविधांच्यादृष्टीने कवलापूर येथील जागा सोयीची आहे. येथील सुमारे १६७ एकर जागा सध्या औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे. ती उपकेंद्रासाठी पुरेशी ठरेल. सांगली, कवलापूर परिसरातील शैक्षणिक संस्था तसेच नजिकच्या शहरांतील महाविद्यालयांसाठी ती जागा मध्यवर्ती आहे. त्यासाठी लढा उभा करायला हवा.
- अनिल डुबल, नवभारत मंडळ, बुधगाव
(समाप्त)