शिराळा : पोषण आहाराचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले.
शिराळा येथील शेतकरी बचत भवनात आयोजित एकात्मिक बाल विकास अभियानांतर्गत तालुकास्तरीय पोषण मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्यास जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरे म्हणाल्या, महिला व बालकल्याण विभागातर्फे सुरू असलेले पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी पोषण आहाराचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण व मातांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करायचे असेल, तर सकस आहाराची आवश्यकता आहे. त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. हे जनजागृतीचे काम अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.
यावेळी त्यांनी अनुराधा देशपांडेलिखित पथनाट्याचे सादरीकरण आणि व प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण पाककृतीबद्दल सर्वांचे कौतुक केले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, प्रकल्प अधिकारी सतीश नवले, सारिका पाटील, डॉ. मनीषा यादव, शैलजा काकडे, अनुराधा देशपांडे, मनीषा पाटील, विद्या पाटील, संगीता जानकर, अरुण पाटील उपस्थित होते.