बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथे सध्या पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नदी उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. येथील अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते अवघ्या महिन्यात पूर्ण होईल. जुन्या विहिरीतून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. या विहिरीला पुरेसे पाणी नाही. नदीवरील नवीन जॅकवेलचे काम अद्याप चालू नाही. तेथे विद्युत पंप व वीज कनेक्शन नसल्यामुळे त्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही.
सध्या जुन्या विहिरीत पाण्याची कमतरता भासत असून, गावात दोन दिवसाआड पाणी येत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी तातडीची उपाययोजना करून गावाला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दोन दिवस आड फक्त अर्धा तासच पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. वारणा डावा कालवा प्रवाहीत झाल्यानंतर ओढ्याने वाहून येणारे पाणी थेट गाव विहिरीमध्ये येते व त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकून ते गावाला पिण्यासाठी पुरविले जात आहे. वारणा डाव्या कालव्यातून येणारे पाणी अशुद्ध व गढूळ असल्यामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे.
चौकट
पाण्यासाठी पायपीट
गेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होऊनही निवडून गेलेल्या सदस्यांच्या एकमेकांतील आडवा-आडवीमुळे गावाचा विकास ठप्प झाला आहे. बिनविरोध निवडून गेलेल्या सदस्यांनी काम करण्याऐवजी एकमेकांना विरोध करण्यात शक्ती खर्च केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांना घागरी घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यामुळे लोकांमध्ये ग्रामपंचायत कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.