सांगली, दि.६ : शिक्षक बँकेच्या पुढाकाराने बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले सहकारी रुग्णालयाच्या नोंदणीचा प्रस्ताव दिवाळीदरम्यान जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.
गोरगरीब रुग्णांना औषधोपचार सुलभ पध्दतीने व्हावा, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, विरोधकांनी अपशकुन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पवार म्हणाले की, सहकारी रुग्णालयासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार शिक्षक बँकेने शेअर्स गोळा करण्याची प्रक्रिया हाती घेतली. आतापर्यंत साठ लाख रुपयांचे शेअर्स भांडवल जमा झाले आहे. लवकरच डॉक्टर, व्यापारी, शेतकरी आणि गोरगरिबांनाही सभासद करून घेतले जाणार आहे.
तळागाळातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. शासनाने मदत केली तर गोरगरिबांवर मोफत उपचारही केले जातील. दिवाळीच्या सुमारास रुग्णालयाच्या नोंदणीचा प्रस्ताव उपनिबंधक यांच्याकडे सादर केला.
रुग्णालयाबाबत विरोधकांकडून वेगवेगळे आरोप होत आहेत. त्यात कसलेही तथ्य नाही. शेअर्स रकमेसाठी बँक सभासदांच्या बँकेतील कायम ठेवीतून पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विरोधकांनी या चांगल्या उपक्रमात सहभागी व्हावे.
यापूर्वी व्यक्तिगत स्वार्थासाठी ३६ कोटी रुपये शिक्षक संघाने परत केले, तेव्हा आरोप करणाºयांची तोंडे का बंद होती? त्यांचा आंबेडकरांच्या नावाला विरोध आहे, की आम्हाला विरोध आहे, हे त्यांनी जाहीर करावे. रुग्णालयाच्या कामात कसलाही अपशकुन करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, सरचिटणीस बाबासाहेब लाड, सतीश पाटील उपस्थित होते.
विस्तारासाठी दोन हजार सभासदांची नोंदणी
शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र वाढीचा प्रस्ताव आहे. सांगली, सोलापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात बँकेचा विस्तार करणार आहे. त्यासाठी सभासद नोंदणी हाती घेतली आहे. आतापर्यंत दोन हजारजणांनी नोंदणी केली आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचशे शिक्षकांनी बँकेची शाखा जिल्ह्यात सुरू करावी, असे मागणीपत्र दिल्याचे समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी सांगितले.