सांगली : गुजरातमधील एखादा दुधाचा ब्रँड महाराष्ट्रासह देशभरात यशस्वी होऊ शकतो, तसा आपल्याकडील सहकारातील दुधाचा ब्रँड यशस्वी का होऊ शकत नाही? महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन आणि पशुसंवर्धन विभागाच्यावतीने आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान समारंभ जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गुजरातमधून तयार होणारा एखादा दुधाचा ब्रँड महाराष्ट्रात येतो आणि आपल्याकडील दुधापेक्षा स्वस्तात त्याची विक्री करतो. या गोष्टी त्यांना कशामुळे शक्य आहेत, याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे दुग्ध व्यवसाय करणारे चांगले लोक आहेत, मात्र तरीही अंतर्गत स्पर्धा आणि आधुनिकीकरणाच्या अभावामुळे त्यांना तितके यश मिळत नाही. गावा-गावात विविध गटा-तटाची दूध संकलन केंद्रे असतात. त्यामुळे संकलनावर होणाऱ्या खर्चाचे नियोजन होत नाही. या सर्व गोष्टी थांबवून अत्याधुनिक गोष्टींचा वापर केल्यास आपल्या भागातही चांगल्या ब्रँडची निर्मिती होऊ शकते. यावेळी जिल्ह्यातील यशस्वी गोपालक शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गत आर्थिक वर्षात कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. नव्या सभागृहात आता पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रमही राबविले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष बसवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती राजेंद्र माळी, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पाटील, समाजकल्याण सभापती किसन जानकर, बांधकाम सभापती दत्तात्रय पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. महेश बनसोडे उपस्थित होते.
सहकारातही दुधाचा सक्षम ब्रँड हवा
By admin | Published: July 15, 2014 12:47 AM