सांगली : हवामान विभागाने 98 ते 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी, असे, निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना परिस्थितीत सर्व प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. कोरोना परिस्थितीबरोबरच संभाव्य पूर परिस्थितीही हाताळणे ही अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून कामकाज करावे. तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत.
जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेले साहित्य यांचीही तज्ज्ञांकडून तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास त्याची तातडीने दुरूस्तीही करून घ्यावी. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या 104 पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरूस्तीबाबतची कार्यवाही करावी. आपत्ती बाबतच्या रंगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात.
बाधीत क्षेत्रात बोट चालविणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष 24 ७ 7 सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्काची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे.
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवावा. तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध धरणे व सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत ठेवा. या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी.सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावेत. यापूर्वी पाण्यामुळे जिल्ह्यातील जे रस्ते बंद झाले होते त्याची यादी तातडीने तयार करावी. पूरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी. त्यामुळे संभाव्य धोके टळतील त्यामुळे जीवित हानीचा धोका टळेल. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे तसेच रस्ता खचून वाहतूक बंद होणार नाही याबाबतची यंत्र सामग्री सज्ज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल यांची माहिती देवून ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे त्याची माहिती जनतेला द्यावी.महाराष्ट्र जीवनप्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावे. संभाव्य आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी साधनसामुग्रीची सज्जता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महसूल विभागाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत तहसिलदारांनी तर ग्रामपंचायती व महानगरपालिकेकडील साहित्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.बीएसएनएलने लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीज ठेवावी व त्यांची रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम, महानगरपालिकेकडील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. महानगरपालिकेनेही वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे. बोटी व अन्य आवश्यक सामग्री सज्ज ठेवावी. धोकादायक निवासी व शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूरबाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास निवारागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पूरबाधीत गावांमध्ये जादा निवारागृहांची उपलब्धता ठेवा. अतिवृष्टीच्या काळात जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने पथके तैनात ठेवावीत.आरोग्य विभागामार्फत कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाची मोहिम सुरू असून संभाव्य पूरपरिस्थितीत लसीकरण थांबू नये यासाठी लसीकरण केंद्रे उभारण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी. तसेच कोविड केअर सेंटर, संस्थात्मक अलगीकरण इतर ठिकाणी हलविण्याची आवश्यकता भासल्यास पर्यायी जागा निश्चित करावी.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगाबाबत सर्तकता बाळगावी. तसेच पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा, पशुधनाचे लसीकरण व औषधाचा साठा या बाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच कृषि विभागाने स्वयंचलित हवामान केंद्रे याबाबतची तपासणी करावी व खते, बी-बियाण्यांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.