सांगली : गेल्या चार दिवसांतील कमी बाधितांच्या संख्येची सोमवारी नोंद झाल्याने दिलासा मिळाला आहे. रविवारी सर्वाधिक बाधित आढळल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, दिवसभरात २० जणांना कोरोनाचे निदान झाले तर सांगली शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. १२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारी दिवसात ४४ नवे रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात होती. प्रशासनानेही तातडीने बैठक घेत सर्व उपाययोजनेच्या सूचना दिल्या आहेत. वाळवा येथे सर्वाधिक ९ रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २२० जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ५ बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ५८५ चाचण्यांमधून १५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या २७० रुग्णांपैकी ४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३८ जण ऑक्सिजनवर तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.