सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा घट होताना, रविवारी २९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढताना, ५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ४७ हजारांचा टप्पा पूर्ण केला.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याने दिलासा मिळत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. महापालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या एकाही मृत्यूची नोंद नाही, तर बाधितांची संख्याही मर्यादित आहे. जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, शिराळा आणि वाळवा तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी आरटीपीसीआरअंतर्गत ३२७ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १९ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९७४ जणांच्या तपासणीत १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उपचार घेत असलेल्या ३७५ रुग्णांपैकी ८६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६८ जण ऑक्सिजनवर, तर १८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
बाधितांची संख्या ४७ हजारावर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने रविवारी ४७ हजारांचा टप्पा पूर्ण केला. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील कोरोनास्थिती आटोक्यात असली तरी, बाधितांची संख्या कायम आहे. त्यानुसार रविवारी रुग्णसंख्या कमी असली तरी, ४७ हजारांचा टप्पा पूर्ण झाला आहेे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७०२२
उपचार घेत असलेले ३७५
कोरोनामुक्त झालेले ४४९४४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७०३
रविवारी दिवसभरात...
सांगली २
मिरज ४
आटपाडी ८
जत ७
कडेगाव, मिरज, पलूस, तासगाव प्रत्येकी २