सांगली : जिल्ह्यातील कोरोना स्थिती पुन्हा एकदा गंभीर रूप धारण करीत आहे. पंधरवड्यापूर्वी रुग्णांची संख्या घटत असल्याने मोकळ्या पडलेल्या रुग्णालयांत आता बेडसाठी संघर्ष करावा लागत असून, आठवडाभरातच रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. आठ दिवसांत ४ हजार ५३२ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असतानाच ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे वाढते रुग्ण व त्यामुळे संसर्गाचा धोका वाढल्याने सध्या प्रशासनातर्फे कडक निर्बंध लागू केले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच बाजारपेठेत गर्दी कायम असल्याने संसर्गाचा धोकाही वाढला आहे. आठवडाभरात अजून चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आठ दिवसांचा आढावा घेतला तर प्रत्येक दिवशी रुग्णसंख्या वाढतच गुरुवारी तर ९२१ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असाच कायम राहिल्यास गेल्या वर्षीपेक्षा रुग्णसंख्येचा आकडा वाढणार आहे. सध्या ऑक्सिजनची सोय असलेल्या बेडसह रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. प्रशासनाने मात्र प्रत्येक कोरोनाबाधिताने रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसून ज्यांना लक्षणे नसतील अथवा सौम्य लक्षणे असतील, त्यांनी होम आयसोलेशनमध्येच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. तरीही उपचारासाठी कोविड सेंटरला प्राधान्य देण्यात येत आहे.
चौकट
आठवड्यातील कोरोनाबाधित संख्या व मृत्यू
८ एप्रिल ४०५ ५
९ एप्रिल ३६३ ५
१० एप्रिल ४११ ४
११ एप्रिल ४८७ ५
१२ एप्रिल ५२६ ६
१३ एप्रिल ६५७ १०
१४ एप्रिल ७६२ १०
१५ एप्रिल ९२१ १७
चाैकट
गेल्या वर्षीचा उच्चांक मोडीत निघणार?
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी गेल्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक १२७४ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, या आठवड्यात कोरेानाबाधितांच्या संख्येतील वाढती गती लक्षात घेता, गेल्या वर्षीपेक्षा अधिक रुग्ण बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानेही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोट
जिल्ह्यात बाधितांवर उपचारासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. तरीही आता परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे व निर्बंधांचे पालन करावे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
कोट
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी उपचारांचे नियोजन करण्यात आले आहे. कोविड रुग्णालयासह आता तालुकास्तरावरही उपचार केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी आता नागरिकांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक