सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती अद्यापही कायम असताना पुन्हा एकदा जिल्हा महापुराच्या कटू अनुभवातून जात असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येत नियंत्रण मिळवत, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीत व्यस्त असलेल्या प्रशासनाला पुन्हा एकदा महापुराच्या व्यवस्थापनातही आघाडी घ्यावी लागल्याने कोरोना आणि महापुरामुळे जिल्हा प्रशासनासमोर कसोटी निर्माण झाली आहे.
राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असताना, जिल्ह्यात मात्र, हजारावर नवीन रुग्णसंख्या कायम आहे. त्यातच शासनस्तरावरून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रशासन पूर्ण ॲक्शन मोडवर आहे. यातच २०१९ नंतर पुन्हा एकदा महापुराचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात पाऊस थांबला असलातरी, नदीतील पाणीपातळी ओसरण्यास उशीर लागत असल्याने महापूरस्थिती कायम आहे. रविवारी पुन्हा एकदा ५४ फुटांवर पाणीपातळी गेल्याने महापुराची दाहकता वाढली आहे.
कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याने अगोदरच सुरू असलेल्या निर्बंधामुळे सर्वसामान्यही अडचणीत असताना, आता महापुराने या अडचणीत वाढ केली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट होत आठशेवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या अद्यापही कायम आहे. त्यात महापुरानंतर पुन्हा संसर्ग वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोना आणि महापूर या दोन्ही संकटांचा सामना करताना प्रशासनाची पुरती कसोटी लागली आहे.
चौकट
कोरोना रुग्णसंख्या कायम असतानाच, प्रशासनाकडून पूरस्थितीवरही लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र, पाण्याचा वाढता विसर्ग आणि एकाच दिवसात पाणलोट क्षेत्रात पडलेल्या विक्रमी पावसाने प्रशासनाने केलेल्या तयारीवर पाणी फिरले व पुन्हा एकदा महापुराची स्थिती येत या उपाययोजनेसाठी आता प्रशासन कार्यरत झाले आहे.