संतोष भिसे ।सांगली : कोरोनाने जगाला अनेक नवनव्या संकल्पनांची ओळख करुन दिली. इन्फ्रारेड थर्मामीटर त्यापैकीच एक. आतापर्यंत कधीही न पाहिलेला हा थर्मामीटर कोरोनामुळे पदोपदी वापरात आला आहे.
आजवर पारंपरिक थर्मामीटर जिभेखाली धरुन तापमान मोजण्याची सवय असल्याने, हे नवे उपकरण अनोखे ठरले आहे. पिस्तूलप्रमाणे कपाळावर रोखल्यानंतर काही सेकंदातच तापमानाची नोंद होते. कोरोना निदानासाठी शरीराचे तापमानच प्राथमिक लक्षण ठरले आहे. त्यामुळे थर्मामीटरला मागणी वाढली आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालये, संस्था, दुकाने, मॉल, बसस्थानके, रेल्वेस्थानके अशा गर्दीच्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यापुढे हजेरी लावल्याविना पुढे सरकताच येत नाही.
वैद्यकीय उपकरणांच्या वितरकांसाठीही हे उपकरण नवेच आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे या थर्मामीटरचे महत्त्व वाढले आहे. त्याच्या वापराबाबत मात्र अनागोंदीच दिसत आहे. अचूक नोंदीसाठी शरीरापासून ३ ते ५ सेंटिमीटर अंतर ठेवण्याचे निर्देश आहेत. प्रत्यक्षात काही ठिकाणी अर्धा फूट, तर काही ठिकाणी चक्क फूटभर अंतरावर तो धरला जातो.
यातून योग्य नोंदीविषयी साशंकता निर्माण होते. कडक उन्हात रांगेत थांबल्यानंतर शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या वाढतेच, त्यामुळेही नोंदींविषयी अनिश्चितता असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.
पाच ते सहा ब्रॅण्डची यंत्रेकोरोना विषाणू चीनमधून पसरला आणि त्याच्या तपासणीसाठीचा थर्मामीटरदेखील चीनचाच वापरावा लागत आहे. बाजारात सुमारे पाच ते सहा ब्रॅण्डचे थर्मामीटर उपलब्ध आहेत. त्यापैकी एखाद्दुसराच भारतीय बनावटीचा आहे. उर्वरित सर्व चिनी आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळून शरीराचे तापमान मोजण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर बाजारात आला आहे. काही सेकंदातच तापमानाची नोंद आणि हाताळण्यासाठी अत्यंत सोपा, यामुळे लोकप्रिय ठरला आहे. कोरोना महामारी ओसरल्यानंतर कदाचित तो पुन्हा विस्मरणात जाईल. पण सध्या तरी बरीच मागणी आहे. - ललित शहा, वितरक