सांगली : महाराष्ट्रातून दरवर्षी दोन हजार कंटेनरमधून युरोप, रशिया, युक्रेन, सौदी अरेबिया, दुबई, श्रीलंका, इंडोनेशिया या देशांना निर्यात होणाऱ्या २७ हजार टन बेदाण्यास यावर्षी ब्रेक लागला आहे. सांगली, नाशिक जिल्ह्यातील शीतगृहांत २५,१०० टन बेदाणा अडकून पडला आहे.
आतापर्यंत केवळ १०० कंटेनरमधून १९०० टन बेदाण्याची निर्यात झाली आहे. यामुळे द्राक्ष, बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. देशातील द्राक्षाच्या एकूण उत्पादनापैकी ९५ टक्के उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. त्यातील ७१ टक्के द्राक्षे खाण्यासाठी, तर २७ टक्के द्राक्षाचा वापर बेदाणा तयार करण्यासाठी होतो.
निर्यात मंदावल्याने स्थानिक दरही पडले
बेदाण्याला प्रतिकिलो ८० ते १२५ रुपयेपर्यंतच दर मिळत आहे. निर्यात मंदावल्याचा परिणाम स्थानिक सौद्यातील दरावरही झाला आहे. मध्यम प्रतीच्या बेदाण्यास प्रतिकिलो १२५ ते २०० रुपयेपर्यंत मिळणारा दर, सध्या केवळ ७० ते १२५ रुपय्आला आहे, असे येथील निर्यातदार मनोज मालू यांनी सांगितले.
नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांचे अर्थकारण द्राक्षासोबत बेदाण्याभोवती केंद्रित झाले आहे. वर्षाला चारशे ते पाचशे कोटीपर्यंत बेदाण्याची उलाढाल होते. यावर्षी ती ठप्प झाली आहे. दर नसल्यामुळे द्राक्षबागायतदार आणि निर्यातदारांचे अर्थकारण बिघडले आहे. उत्पादन खर्चही पदरात पडत नाही, असे चित्र आहे.