लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या लाटेने आतापर्यंत ७२ मुलांच्या आई-बाबांना हिरावून घेतले आहेत. त्यातील ७० मुलांच्या आई-बाबांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलांचे दोन्ही पालक कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शासनाने घेतली असून त्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे जीव गमावलेल्यांपैकी अनेक व्यक्तींची मुले १८ वर्षांखालील आहेत. अशा मुलांचे संगोपन व संरक्षणाची गरज आहे. बालकांच्या न्याय हक्कांसाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. प्रशासनाने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ सुरू केली आहे. आई-बाबा हिरावलेल्या मुलांच्या सर्वेक्षणाचे कामही सुरू आहे. आतापर्यंत ७२ मुलांनी पालकांना गमावले आहे. या मुलांच्या शिक्षण, संगोपनासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
चौकट
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत
१. शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत अनाथ, कैदी, एड्सग्रस्त मुलांना दरमहा ११०० रुपयांची मदत दिली जाते. ही मदत आता कोरोनामुळे आईबाबा हिरावलेल्या मुलांना दिली जाणार आहे.
२. दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शासकीय निरीक्षणगृहात ठेवले जाणार आहे.
३. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून मुलांच्या पालकांशी संपर्क साधून मदत दिली जाणार आहे.
चौकट
या अनाथ मुलांचे सरकार काय करणार
१. ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले आहेत, अशा बालकांना बालगृहात ठेवले जाणार आहे.
२. या मुलांच्या संगोपनासह शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून उचलली जाणार आहे.
३. बालगृहात ठेवलेल्या मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाणार आहे. त्याची जबाबदारी बाल संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे.
कोट
कोरोनामुळे आई-बाबा हिरावलेल्या मुलांच्या पालनपोषण, शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. सध्या अशा मुलांचा सर्व्हे सुरू आहे. त्यासाठी टास्क फोर्सही तयार केला आहे. लवकरच त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णयही घेतला जाईल. या मुलांच्या मालमत्तेचा प्रश्नही शासनच हाताळणार आहे.
- सुवर्णा पवार, महिला बालविकास अधिकारी, सांगली.
आकडेवारी
कोरोनाने आई-बाबा हिरावलेल्यांची संख्या : ७२
मुले : ४०
मुली : ३२