सांगली : एस.टी.मध्ये काम करताना कोरोनाने मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांची विमा भरपाई देण्याची मागणी एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत व सचिव नारायण सूर्यवंशी यांनी केली आहे.
मिरज आगारातील वाहक व कामगार संघटनेचे खजिनदार फैजलरहेमान मन्सूर नालबंद (वय ४१) यांचे कोरोनाने सोमवारी (दि. २६) निधन झाले. ते गेली १७ वर्षे वाहक म्हणून व पाच वर्षांपासून एस.टी. कामगार संघटनेचे खजिनदार म्हणून काम करीत होते. संघटनेच्या प्रत्येक कामात हिरिरीने सहभाग घ्यायचे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव मैदानात राहिले. कामादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जयसिंगपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते, तेथेच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. कामगार संघटनेच्या सांगली व मिरज आगारांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
खोत व सूर्यवंशी यांनी मागणी केली की, एस.टी.मध्ये काम करताना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना कोरोना योद्धा म्हणून जाहीर केले जावे. शासनाने ५० लाखांची विमाभरपाई द्यावी. नालबंद यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार गेला असून, एका सदस्याला एस.टी.च्या नोकरीत घ्यावे. कोरोनामुळे निधन होणाऱ्या सर्वच एसटी कर्मचाऱ्यांना भरपाई मिळावी.