फोटो : १९०५२०२१ एसएएन०१ : शिरसीतील तिघा मृतांवर शिराळा नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : अवघ्या तेरा तासात कोरोनाने पती-पत्नीसह तरुण मुलाचा बळी घेतला. ही हृदयद्रावक घटना शिराळा तालुक्यातील शिरसी येथे मंगळवारी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे.
सहदेव विठ्ठल झिमूर (वय ७५), त्यांची पत्नी सुशीला (६६) आणि मुलगा सचिन (३०) अशी मृतांची नावे आहेत.
शिरसीतील सहदेव झिमूर कोरोनाची लागण झाल्याने गेल्या २२ दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर पत्नी सुशीला यांनाही लागण झाली. त्यांचा मुलगा सचिन मुंबई येथे खासगी कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता आहे. लॉकडाऊन असल्याने दीड महिन्यांपूर्वी तो गावी आला होता. आई-वडिलांपाठोपाठ तोही बाधित झाल्याने त्याला आईसह त्याच रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.
तब्येतीत सुधारणा झाल्याने सहदेव झिमूर दोन दिवसांपूर्वी घरी आले होते. मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने मंगळवारी (दि. १८) पहाटे पाचला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर पुतण्या रोहित याने अंत्यसंस्कार केले. सहदेव यांचा मृत्यू होऊन बारा तास होतात तोच सायंकाळी पाचच्या दरम्यान पत्नी सुशीला यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची लगबग सुरू असतानाच तासाभरात सायंकाळी सहाला सचिनचाही मृत्यू झाला. तेरा तासात बघता-बघता एक कुटुंब संपले.
सचिनचा वर्षापूर्वीच विवाह झाला होता. तो पत्नीसह मुंबईत राहात होता. लॉकडाऊनमुळे दोघे पती-पत्नी शिरसीतच होते. सचिनला दोन विवाहित बहिणी आहेत. सहदेव हे जिल्हा परिषद सदस्या आशा झिमूर यांचे हे चुलत सासरे, तर मनस्वी फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विजय झिमूर यांचे चुलते होत.
चौकट
शिराळा नगरपंचायतीची मदत
झिमुर कुटुंबातील रोहित झिमुर व निखिल झिमुर यांनी सुरेश शिंदे, संतोष दंडवते, निलेश गवळी आणि शिराळा नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतांवर अंत्यसंस्कार केले. तहसीलदार गणेश शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी योगेश पाटील, लक्ष्मण मलमे, संजय इंगवले, विजय शिंदे, मुनीर लंगरदार, अली मुंडे, रमेश जाधव, संतोष कांबळे, सागर दाभाडे, अमोल जाधव, सचिन कांबळे यांनी जबाबदारी पार पाडली. मध्यरात्री अडीच वाजता सर्वजण शिराळ्याला परत आले. प्रहार संघटनेचे श्रीराम नांगरे यांनी रुग्णवाहिकेमधून तिघांचे मृतदेह शिरसी येथे नेऊन अंत्यसंस्कार करण्यास मदत केली.