सांगली : अनलॉकनंतर नोकरदार, कामगार रोजगारासाठी बाहेर पडल्यामुळे पहिल्या लाटेत कोरोनाला वेळेवरच रोखण्यात यश मिळविलेल्या जिल्ह्यातील ४१६ गावांपैकी ३८३ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दुस-या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे काही सरपंचही यातून वाचले नाहीत. जिल्ह्यात सध्या केवळ ३३ गावेच कोरोनामुक्त असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात ७३५ गावे आणि ६९९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी पहिल्या लाटेत ४१६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. संस्थात्मक क्वारंटाइन, मास्क, लॉकडाऊनचे काटेकोर पालन केल्यामुळे एकही कोरोनाचा रुग्ण गावांमध्ये नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता मार्चपासून सुरू झाली. महिनाभर गावांनी कोरोनाला गावांच्या वेशीवर रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण, प्रशासकीय यंत्रणेचीच साथ तोकडी पडल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि गावच्या प्रशासनानेही हात टेकले. अनेक प्रयत्न आणि उपाययोजना करूनही कोरोनामुक्त ४१६ गावांपैकी चक्क ३८३ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील केवळ ३३ गावेच कोराेनामुक्त असून तेथील नागरिकांच्या मनातही कोरोनाबद्दल भीती आहे.
चौकट
पहिल्या लाटेतील कोराेेनामुक्त गावे
पहिल्या लाटेतील कोरोनामुक्त गावांची तालुकानिहाय संख्या : शिराळा तालुका : ५५, वाळवा ५९, कवठेमहांकाळ २४, मिरज ३१, जत ९१, खानापूर ४८, तासगाव ३९, कडेगाव ३४, आटपाडी २४, पलूस १२ या गावांमधील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे पहिल्या लाटेत गावामध्ये शिरकाव झाला नाही.
चौकट
-जिल्ह्यात एकूण गावे : ७३५
-कोरोना रुग्ण असलेली गावे : ७०२
-कोरोनामुक्त गावे : ८६९
चौकट
कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाहेरच्यांना गावबंदी होती. मात्र, अनलॉकनंतर गावातील कामगार, मजूर, नोकरवर्ग कामानिमित्त बाहेर पडले. पुन्हा ते गावामध्ये परतले, त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्यावेळी नागरिकांचा लॉकडाऊनला प्रतिसाद होता, तो सध्या राहिला नाही. संस्थात्मक क्वारंटाइन, सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापरही कमी झाला आहे. यामुळेच कोरोनामुक्त गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आम्ही आजही गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी उपाययोजना राबवत आहे.
-राधिकाताई बागल, सरपंच, लेंगरे, ता. खानापूर
कोट
गतवर्षी यात्रेच्या अगोदर चार दिवस मुंबई तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांची नोंद ठेवली गेली होती. त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाइन केले होते. तसेच येणाऱ्या नागरिकांवरही शासनाचे निर्बंध होते. मात्र, यावेळी मुंबईसह अन्य ठिकाणांहून येतानाच काही जण कोरोना पॉझिटिव्ह होऊन आले होते. त्याची माहिती मिळत नव्हती. यामुळे कोरोना रुग्ण वाढले. लॉकडाऊन नावापुरते असल्यामुळे कोरोना प्रसार होण्यास मदत होत आहे.
-मारुती भोसले, सरपंच, शिरशी, ता. शिराळा
कोट
गतवर्षी कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही गावात बैठक घेऊन बाहेरून येणारे, जाणारे यांची माहिती आरोग्य विभागाला देत होतो. त्यांची तपासणी तत्काळ करत होतो. बाहेरून आल्यानंतर १४ दिवस त्यांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला होता. मास्क गावात प्रत्येकाला बंधनकारक केला होता. त्यामुळे कोरोनाचा गावात शिरकाव झाला नाही. परंतु, यावर्षी कोरोनाची लाट जोरात आहे. उपाययोजना करूनही आम्ही कोरोना रोखू शकलो नाही.
-सूर्यकांत पाटील, सरपंच, जाखापूर, ता. कवठेमहांकाळ