लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला होता. त्या तुलनेत यंदा एप्रिल, मे महिन्यात रुग्णसंख्या व मृत्युदरही आटोक्यात राहिला आहे. सध्या महापालिका क्षेत्राचा मृत्युदर २.७ टक्के इतका आहे. हाच मृत्युदर ऑगस्टमध्ये ३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्याही स्थिर आहे.
महापालिका क्षेत्रात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर मे व जून महिन्यात कोरोना रुग्णाला सांगलीकरांनी वेशीवर रोखले होते. जुलै महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. या महिन्यात १३९० रुग्ण सापडले, तर ४७ जणांचा मृत्यू झाला. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मात्र कोरोना रुग्णासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली होती. या काळात ऑगस्टमध्ये ५ हजार ६०० तर सप्टेंबरमध्ये साडेनऊ हजार रुग्ण आढळून आले. कोरोनाचा कहर झाल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. या काळात मृत्युदर २.९ ते ३ टक्के इतका होता. त्यानंतर मात्र कोरोनाची पहिली लाट ओसरली. नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत महिन्याला २०० ते ३०० रुग्ण सापडत होते, तर आठ ते दहा जणांचा बळी जात होता.
मार्चपासून महापालिका क्षेत्रात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. एप्रिल व मे महिन्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यासोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले. एप्रिल महिन्यात ४ हजार ४०० तर १९ मेपर्यंत ३ हजार ९५६ रुग्ण आढळून आले आहेत. मृत्युदरही २.७ टक्के इतका आहे. पण गतवर्षीच्या तुलनेत या दोन महिन्यांत रुग्णसंख्या व मृत्यूचा दरही कमीच राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
चौकट
महापालिका क्षेत्रातील स्थिती
महिना कोरोना रुग्ण मृत्यू
एप्रिल २०२० १ १
मे २०२० ८ १
जून २०२० ८ १
जुलै २०२० १३९० ४७
ऑगस्ट २०२० ५६०२ १५४
सप्टेंबर २०२० ९६०३ २७५
ऑक्टोबर २०२० १६४६ ४९
नोव्हेंबर २०२० ३१६ १०
डिसेंबर २०२० १७५ ६
जानेवारी २०२१ १८२ ४
फेब्रुवारी २०२१ २०२ २
मार्च २०२१ १००३ ८
एप्रिल २०२१ ४४८६ ६९
१९ मे २०२१ ३९५६ १३०
चौकट
कोट
महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण व मृत्युदर कमी असला तरी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार व्हावेत, यासाठी आरोग्यसेविका प्रयत्न करीत आहेत.
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका