सांगली : शहरातील एका कामगार नेत्याची पत्नीला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाली. महापालिकेच्याच आरोग्य केंद्रात अँटिजन चाचणी केली होती. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच उपचार घेऊन बऱ्याही झाल्या. आता दोन महिन्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांना औषधोपचार, औषध फवारणीबाबत चौकशी करणारे दूरध्वनी गेले. कोरोनासारख्या संवेदनशील कामातही महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
याबाबत नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली आहे. आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. साखळकर म्हणाले की, एका कामगार नेत्याच्या पत्नीला त्रास होऊ लागल्याने १२ जून रोजी अभयनगर आरोग्य केंद्रावर कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल पाॅझिटिव्ह आला. तेव्हा महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषधोपचाराबाबत कसलीच चौकशी केली नाही. त्या होमआयसोलेशनमध्ये उपचार घेऊन बऱ्याही झाल्या. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातून त्यांना दूरध्वनी गेला. ‘तुम्ही पॉझिटिव्ह आला आहात, तुमच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत का? घरात औषध फवारणी व फलक लावण्यासाठी येणार आहे’, असे सांगितले गेले. त्यांच्या मोबाइलवरही पाॅझिटिव्ह असल्याचा संदेश आला. दोन महिन्यांपूर्वी त्या पाॅझिटिव्ह आल्यानंतर कसलीच चौकशी न करणाऱ्या आरोग्य विभागाला आताच कशी जाग आली, हा संशोधनाचा विषय आहे. दररोज प्रशासनाकडून कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनामुक्त रुग्णांची आकडेवारी जाहीर केली जाते. या आकडेवारीवर कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही साखळकर यांनी केली आहे.