कुपवाड : कोरोनाच्या संसर्गाचा धोका असूनही जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कुपवाड, मिरज एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील ९५ उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील या उद्योगांना कोरोनाबरोबरच कामगारांच्या टंचाईचा फटका बसला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात केवळ सात ते आठच उद्योग सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि संचारबंदीमुळे कामगार कामावर येत नसल्याचे चित्र आहे. तसेच उद्योजकांनाही या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक आणि उत्पादित मालाच्या विक्रीचा प्रश्न भेडसावत आहे.कोरोना या गंभीर विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. या बंदीतून मिरज, कुपवाड एमआयडीसी आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेतील ९५ उद्योगांना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. या अत्यावश्यक सेवेत कुपवाड एमआयडीसीत ६१, मिरज एमआयडीसीत ३३ आणि वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योगाचा समावेश शासनाने केला आहे.नागरिकांना संचारबंदीच्या कालावधीतही जीवनावश्यक आणि अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, या उद्देशाने या उद्योगांना प्रतिबंधात्मक आदेशातून वगळण्यात आले होते. परंतु या उद्योगांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊनही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात अत्यंत कठीण समस्यांचा सामना करावा लागला आहे.
कुपवाड, मिरज आणि सांगलीतील या अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवेतील उद्योगांची अवस्था इकडे आड-तिकडे विहीर अशी झाली आहे. कोरोनासारखा गंभीर आजार असल्याने आणि संचारबंदीच्या कालावधीतील भीतीमुळे कामगार कामावर येईनात, अशी स्थिती आहे. उद्योग किमान दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यासाठी कामगार कामावर येणे गरजेचे आहे.कामगारांना कामावर येण्यासाठी विनंती केली आहे. तरीही कामगार कोरोना आणि संचारबंदीच्या भीतीमुळे कामावर येत नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करावा की कामगारांच्या आरोग्याची काळजी करावी, अशा अडचणीतही हे उद्योजक अडकून पडले आहेत. त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.