सांगली : सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून राधेकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि. चे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे.
कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे . सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
अशा या संकटाच्या वेळी समाजाला धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येणे आवश्यक आहे , याच सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.यावेळी राधाकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि.चे पियुषभाई घेटीया, रोनक घेटीया, राज घेटीया, शिव घेटीया यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रफुल्लचंद्रा घेटीया यांनी सुपूर्त केलेल्या रकमेमध्ये प्रधानमंत्री सहायता निधीसाठी 51 लाख, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 45 लाख 51 हजार, जिल्हा प्रशासनासाठी 5 लाख असे एकूण 1 कोटी 1 लाख 51 हजारांची मदत यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, घेटीया यांच्याकडून करण्यात आलेली मदत अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. या मदतीद्वारे त्यांनी व्यक्त केलेली प्रेम व भावना कोवीड-19 या साथरोगाच्या आस्मानी संकटातून उभारी देण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरतील. यापुढेही घेटीया यांच्यासारखे अनेक दानवीर समाजाच्या मदतीसाठी पुढे येतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी घेटीया यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.