इस्लामपूर: इस्लामपूर(सांगली)शहरातील एकाच कुटुंबातील २४ आणि निकटच्या संपर्कातील २ असे एकूण २६ जण कोरोना विषाणूच्या बाधेने ग्रासले असल्याची माहिती मिळाली अन चिंताक्रांत झालो.मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून बाधीत रुग्णांवर उपचार,शहरातील नागरिकांच्या हालचालीवर प्रतिबंध आणि परिसराचे सर्वेक्षण अशा पातळीवर यंत्रणा राबविली.त्यामुळे आता २६ पैकी २४ जण कोरोनामुक्त झाले.त्याचवेळी सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आणि इस्लामपूरचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यावर असणाऱ्या दुहेरी दडपणातून मी आज थोडासा मुक्त झालोय अशा भावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवर व्यक्त केल्या.
२३ मार्चच्या रात्री एका कुटुंबातील चौघे कोरोना बाधीत असल्याची पहिली बातमी थडकली.यावर मात करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या हे ठरवेपर्यंत बाधितांचा हा आकडा २३ वर गेला.त्यामुळे हा संपूर्ण परिसर सील करून शहराच्या सीमाही बंद करण्यात आल्या.नागरिकांच्या गर्दी करणाऱ्या हालचालींवर नियंत्रण आणले.आरोग्य तपासणी सुरू केली.
निकटचे आणि लांबून संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी बनवली.त्यातील निकटच्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर अनेकांना घरीच विलगी करणात राहण्याच्या सूचना दिल्या.त्यांच्यावर ग्रहभेटीद्वारे लक्ष ठेवले.बाधीत रुग्णांवर मिरजेत उपचार सुरू ठेवले.त्यामुळेच आता जिल्हा आणि इस्लामपूर शहर कोरोना मुक्तीकडे जात असल्याचा आनंद आहे,असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.आणखी जे दोन रुग्ण आहेत तेसुद्धा लवकरच कोरोना मुक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री पाटील म्हणाले,आज मी काहीसा चिंतामुक्त झालोय.! माझ्या इस्लामपूर मतदारसंघातील जे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते, ते आज पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची मला खात्री आहे. पण अद्यापही लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व नागरिकांनी त्याचे पालन करावे.
इस्लामपूरकरांनी व सांगलीच्या जनतेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. पण कुणीही गाफील राहू नका. सर्वांनी सोशल डिस्टन्सचे पालन करा. नागरिकांनी विलगीकरणाचा राबवलेला प्रयोग १०० टक्के यशस्वी केल्याने आपण यावर मात करू शकलो. माझी महाराष्ट्रातील जनतेस विनंती आहे की, त्यांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तर आणि तरच आपण या रोगावर विजय मिळवू.