कडेगाव : सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर संचारबंदीचे पालन केले जात असून ग्रामीण भागात गावकरी दक्ष झाले आहेत.
शिरसगाव तालुका कडेगाव येथे कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या ग्रामसमितीने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत मुंबई पुण्यासह मोठ्या शहरातून गावात स्वगृही आलेल्या नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अन्य गावातील कोणीही गावात येणार नाही यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावात येणाऱ्या रस्त्यावर दगड व लाकडी ओंडके टाकून रस्ता बंद केला आहे.शिरसगावच्या गावकऱ्यांनी अन्य गावातील व्यक्तींना गावात प्रवेश बंदी केली आहे. याबाबत बुधवारी कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या ग्रामसमितीने निर्णय घेतला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना केल्या आहेत. यात प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच गावकरी देखील स्वतःहून नियम पाळत आहेत. संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी विविध कडक उपाययोजना केल्या आहेत. गावातील किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ५ ते ८ यावेळेतच उघडली जात आहेत.दुकानाबाहेर मार्किंग केलेल्या जागेत सुरक्षीत अंतरावर ग्रामस्थ उभा राहून किराणा माल घेत आहेत.
गावातील खाजगी दवाखान्यात एकावेळी फक्त चारच रुग्ण घेण्याबत डॉक्टरांना सुचवले आहे. गावाच्या सुरक्षितेसाठी आशा कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे निश्चितच आपले गाव कोरोनापासून दूर राहील .असा विश्वास सरपंच सतीश मांडके यांनी व्यक्त केला .प्रवेशबंदीचे फलक अत्यावश्यक सेवा ,रुग्णवाहिका,प्रशासकीय अधिकारी,शासनाचे पास दिलेली वाहने याशिवाय अन्य कोणासही कोरोना प्रतिबंधक गाव समितीच्या परवानगी शिवाय गावात प्रवेश मिळणार नाही असा फलक गावच्या प्रवेशद्वारावर लावला आहे.