सांगली : विजयनगर, सांगली येथील मृत कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी पंधरा जणांच्या स्वाबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित ४३ जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १२ जणांचा अहवाल अजून येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.शहरातील विजयनगर येथील सिध्दीविनायक हौंसिग सोसायटीमधील एका बँक कर्मचार्यास कोरोना झाल्याचे रविवारी तपासणीत स्पष्ट झाले होते. या रूग्णाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती.
विजयनगर येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तत्पूर्वी इस्लामपूर येथे २६ कोरोना रुग्ण आढळले होते. जिल्हा प्रशासनाने विजयनगरचा संपूर्ण परिसर सील केला होता. तसेच या व्यक्तीच्या संपर्कातील ४३ लोकांना आयसोलेशन कक्षात ठेवले होते व त्यांचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.
यात मृत कोरोनाबाधित व्यक्तीचे आई वडील पत्नी मुलगा भाऊ या पाच जणांचा बँकेतील अकरा कर्मचारी, खाजगी रुग्णालयातील डॉक्टर व त्यांचे सहाय्यक यांचा समावेश होता. यातील कोरोनाबाधिताची पत्नी, आई-वडील व भाऊ यांचे अहवाल सोमवारी सकाळी निगेटिव्ह आले.
सर्व ४३ जणांचे स्वाब तपासणीसाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. सोमवारी रूग्णाच्या कुटुंबातील ५ व्यक्तीसह अन्य ११ असे १६ जणाचे अहवाल निगेटीव्ह आले होते. मंगळवारी आणखी १५ जणाचे अहवाल प्राप्त झाले असून तेही निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत ४३ पैकी ३१ जणांचे स्वाब तपासणी अहवाल प्राप्त झाला असून बँकेतील त्यांचे सहकारी, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, कर्मचार्यांसह इतर सर्वांचे अहवाल अजून प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.