सांगली : आठवडाभर काम झाले की वीकेंडला श्रमपरिहार, चमचमीत जेवणाची मेजवानी आणि शक्य झाल्यास आऊटिंग... याला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर कायम असल्याने अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर गंडातर आल्याने अनावश्यक खर्च कमी करण्याबराेबरच खर्चात कपात करण्याची सवय अनेकांना लागली आहे. अगदी किचनमधील भाज्यांचा ढीग कमी झाला आहे, तर आठवड्याला सलूनला जाणाऱ्यांनी आता घरातच दाढी करायला सुरुवात करत बचत स्वीकारली आहे.
कोरोनामुळे लागू झालेला लॉकडाऊनमुळे विस्कळीत बनलेले जनजीवन अद्यापही जैसे थे आहे. त्यामुळे अनेकांनी बचत आणि भविष्याच्या तरतुदीचा मार्ग निवडला आहे. आठवड्याला बाहेरहून पदार्थ मागविणे, महिन्यातून एकदा फिरायला जाणे, पाहुण्यांची रेलचेल बंद झाली असून त्याऐवजी आहे तसेच सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने प्राधान्य दिले आहे.
चौकट
या ठिकाणी केली जात आहे खर्चात कपात
आठवड्याचा भाजीपाला एकदम खरेदी बंद करून लागेल तेवढ्याच भाज्या खरेदी केल्या जात आहेत.
* प्रत्येकाकडे असलेल्या दोन दोन क्रमांकांऐवजी आता केवळ एकाच क्रमांकावर रिचार्ज मारला जात आहे.
* हॉटेलऐवजी घरातच उपलब्ध साहित्यातून पाककृती केली जात आहेत, जेणेकरून खर्चाची बचत होईल.
* वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसाला संपूर्ण पै-पाहुण्यांना होणाऱ्या सेलिब्रेशनला फाटा देत घरगुती कार्यक्रम होत आहेत.
* महिन्याला मुलांसाठी होत असलेली कपडे खरेदी थांबली असून शाळा नसल्याने मुलांवरील खर्चही कमी होत आहे.
* घरात कंटाळा आला म्हणून आणण्यात येणारे पार्सल बंद होऊन घरातच स्वयंपाक केला जात आहे.
चौकट
१) एरवी सुट्टी दिवशी ‘वन डे ट्रीप’ला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. निर्बंधांमुळे अगोदरच सर्वत्र बंदी असल्यानेही अनेक जण सुट्टी दिवशी घरीच थांबणे पसंत करत आहेत.
२) खाण्याच्या सवयी बदलत अनेक घरांमध्ये दर आठवड्याला असलेले मांसाहाराचे प्रमाण कमी झाले आहे.
३) दाढी घरी करण्याबरोबरच अनेक जणांनी ट्रीमरच्या मदतीने घरीच केस कटिंगही शिकून घेतले आहे.