आटपाडी : आटपाडी शहरातून गुरुवारपासून विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी रस्त्यावरच करा आणि त्यांना योग्य त्या रुग्णालयांत उपचारासाठी व विलगीकरणासाठी पाठवा. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच उपाययोजनाबाबत चर्चा करण्यासाठी तहसीलदार मुळीक यांनी ग्रामपंचायत येथे तातडीची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी सरपंच वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांची वाॅर्डनिहाय समिती स्थापन करावी तसेच कोरोना रुग्ण आढळल्यास त्याने घराबाहेर फिरू नये म्हणून वाॅर्डनिहाय समितीने नियंत्रण ठेवावे व त्या रुग्णाची तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची दैनंदिन आरोग्यविषयी चौकशी करावी, अशा सूचना तहसीलदार मुळीक यांनी केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, सरपंच सौ. वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, तलाठी सुधाकर केंगार उपस्थित होते.