लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरासह तालुक्यात कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरुवात केली आहे. प्रशासन आक्रमक होऊन कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे.
विटा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरत आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशीच विटा शहरात संचारबंदीचा फज्जा उडाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा शुक्रवारी खडबडून जागी झाली. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल नलवडे यांच्यासह पथकाने शुक्रवारी विटा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात येऊन कारवाईचा बडगा उगारला.
या पथकाने विनामास्क व विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यातील अनेकांची तातडीने सक्तीने जलद अँटिजेन चाचणी घेतली, तर काही दुचाकीस्वारांच्या दुचाकी जप्त केल्या. संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण मुक्तसंचार करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. या पथकाने पुन्हा तेथून नागेवाडी येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी तेथेही काहीजण विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांचीही या पथकाने सक्तीने कोरोना चाचणी घेतली. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांना विटा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पथकाची कारवाई पाहून अनेकांनी घरातच राहणे पसंत केले.
चौकट :
थेट रुग्णालयात दाखल
विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यातच चाचणी घेतली असून, त्यात पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नागेवाडी येथे होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांच्या घरी भेटी देऊन त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने ही मोहीम सुरू केली असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.