मिरज : मिरजेत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या सुमारे दीडशे जणांना अडवून त्यांची सक्तीने रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामुळे सकाळी अकरानंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांची धावपळ उडाली होती.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सकाळी सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी अकरानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची महापालिका व पोलिसांनी रॅपिड अँटिजन कोरोना चाचणी करण्यात आली. लक्ष्मी मार्केट चाैकात सुमारे दीडशे जणाना अडवून त्यांची चाचणी केली. या कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आलेल्यांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. बुधवारी तपासणी केलेल्यापैकी कोणीही पाॅझिटिव्ह आढळले नाही. मात्र सक्तीच्या चाचणीमुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. यापुढेही नागरिक विनाकारण रस्त्यावर आढळल्यास त्यांची चाचणी करण्यात येणार असल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.